🌟पाचोरा येथे पत्रकारावर गुंडाकरवी हल्ला करणाऱ्या आमदार किशोर पाटील यांच्याविरुद्ध कारवाई करा......!


🌟वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेची मागणी🌟


वडवणी/प्रतिनिधी   

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर गुंडाकरवी भ्याड हल्ला केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार किशोर पाटील यांच्याविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करून, त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने तहसीलदार व पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.


 यासंदर्भात वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने पाचोरा येथील एका घटनेसंदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती. त्याचा राग धरून पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ही क्लीप व्हायरल झाल्यावर आमदारांनी साळसुदपणे शिविगाळीचे समर्थन देखील केले होते. या घटनेची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटली होती. मात्र तेव्हा संदीप महाजन यांनी समन्वयाची, सामंजस्याची भूमिका घेतली. तरीही आमदारांची खुमखुमी थांबत नव्हती. दरम्यान, गुरुवारी संदीप महाजन रेल्वे आंदोलनाची बातमी कव्हर करून घरी परतत असताना चार पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. नगर पालिकेसमोर ज्या चौकात हल्ला झाला तो चौक महाजन यांच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांच्या नावानं ओळखला जातो. येथेच त्यांना लाथाबुक्कयांनी बेदम मारहाण केली आहे. महाजन त्यात गंभीर जखमी झाले आहेत. संदीप महाजन यांनी पोलिसात तक्रार दिली असून आ. किशोर पाटलांनीच आपल्यावर गुंडाकरवी हल्ला केल्याची तक्रार केली आहे.

सत्य बातमी देणाऱ्या पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या घटना महाराष्ट्रात सातत्यानं घडत आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींना काम करणे अशक्य झाले असून राज्यात माध्यम स्वातंत्र्यच धोक्यात आले आहे. पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि राज्यपालांनी त्यांची आमदारकी रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या आदेशानुसार तसेच विश्वस्त किरण नाईक, राज्य अध्यक्ष शरद पाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. 

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष विनायक जाधव, सरचिटणीस सतिश सोनवणे, माजी अध्यक्ष सुधाकर पोटभरे, कोषाध्यक्ष शांतीनाथ जैन, डिजिटल मिडिया परिषदेचे तालुका अध्यक्ष ओमप्रकाश साबळे, पत्रकार महेश सदरे, पत्रकार अतुल जाधव, पत्रकार वाजेद पठाण, पत्रकार अर्जुन मुंडे, पत्रकार हरी पवार, पत्रकार धम्मपाल डावरे, पत्रकार हर्षद उंडाळकर, पत्रकार शंकर झाडे यांच्या सह अनेक पत्रकार उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या