🌟श्रावण मास प्रारंभ विशेष : हासरा,नाचरा,लाजरा श्रावण कुठे झाला गायब.....!

'श्रावण मास सुरू झाला आहे.श्रावणाचे अनेक कवींनी आपआपल्या परीने जे वर्णन केले आहे ते पाहता,श्रावण म्हणजे आनंदाचा महिना. एक नवोदित कवी म्हणतो'-

🌟हिरवीगार झाली वनराई, उधाण आले आनंदाला, सणासुदीच्या उत्साहाने श्रावण महिना मजसी भावला🌟

असा हा मनाला भावणारा श्रावण  दुर्गा भागवतांच्या शब्दात सांगावयाचे म्हटले तर, श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन, कोवळ्या तृणांकुरांनी पृथ्वीचे विशाल अंगण तर झाकून जातेच, पण उघडे बोडके दगडही शेवाळ्याच्या मखमली पांघरूणाने मोहक रूप घेतात.या महिन्यात अनेक महत्त्वाचे आणि आनंदाचे सणही येतात. या महिन्यात येणारे सण सर्वदृष्टीने महत्त्वपूर्ण असे असतात.नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी,पोळा असे सण येतात.अनेक जण श्रावण महिन्यात महिनाभर उपवास करतात.या महिन्यात शिवाची भक्तीही मोठ्या प्रमाणात केली जाते. उपवास याचा अर्थ उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे,याचा थोडक्यात अर्थ असाही म्हणता येईल की उपवास म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात( निसर्ग नियमानुसार) राहणे.पण सध्या मात्र असे होताना दिसत नाही.या महिन्यात येणाऱ्या सणांना तसे म्हटले तर बरेच वैज्ञानिक संदर्भ आहेत.

आपण महाराष्ट्रीयन सणप्रिय प्राणी आहोत असे म्हटले तर ते वावगे वाटू नये. आपल्या सणावारांची अनेकदा अनेक जण टिंगलटवाळी करीत असले तरी त्या मागचे त्यांचे अज्ञान हेच कारणीभूत असते. आपल्या सणामागे पर्यावरण संवर्धन, वैज्ञानिक दृष्टिकोन असल्याचे दिसून येते.या महिन्यात जठराग्णी मंद असतो,त्यामुळे एक वेळचे जेवण हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.या महिन्यात नाग पूजा केली जाते. कारण सर्प हा मानवाचा शत्रू नसून मित्र आहे.त्याची पूजा म्हणजे त्याची हत्या करू नये हा खरा संदेश.पोळ्याला आपण बैलाची पूजा करतो,त्याचे काबाड कष्ट शेतकऱ्यासाठी आणि पर्यायाने सर्वांसाठी मोलाचे आहेत.भारतीय संस्कृतीने प्राणीमात्रावर जी दया शिकविली त्यामागे असेच उदात्त दृष्टिकोन आहे तो सर्वश्रुत आहे.संत तुकारामांनी- "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" असे म्हटले आहे.ते यादृष्टीनेच,पण या सणामागे असलेले मूळ उद्देश मात्र आपण अलीकडच्या काळात गुंडाळून ठेवले असून उलट विपर्यास करून पर्यावरणाची अर्थातच सामाजिक कार्याची घडीच आपण विस्कटून टाकत आहोत.

गेल्या काही वर्षात श्रावणात अद्याप दगड हिरव्यागार मखमलीने झाकले जात नाहीत, आणि पाऊस त्याच्या लहरीने वागताना पाहात आहोत. निसर्गाचे चित्र आणि चक्र पालटत चालले आहे.श्रावणाचे सर्वांच्या तोंडी असलेले "श्रावणवासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे" हे गीत केव्हाच लोप  पावत चालले आहे.तरीही अद्याप आपले डोळे मात्र उघडलेले नाहीत. त्यामुळेच असा हासरा, नाचरा,लाजरा श्रावण सध्या कुठे गायब झाला आहे?असेच नाविलाजाणे म्हणावे लागत आहे.हे चित्र पालटण्यासाठी आपण आपल्या दिनचर्यात बदल करायला हवे.तसेच संस्कृतीचे रक्षण करण्याचा संकल्प करण्याची आज नितांत गरज आहे.अन्यथा भविष्यकाळ व भावी पिढी आपणास माफ करणार नाही एवढं मात्र निश्चित.....

गुलाब भावसार पत्रकार बीड ९४२३७१५९८२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या