🌟राज्य परिवहन आयुक्त आणि राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत परवाना नूतनीकरण आता फेसलेस...!


🌟उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी दिली माहिती🌟

परभणी (दि.०९ ऑगस्ट २०२३) :  राज्य परिवहन आयुक्त आणि राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत परवाना नूतनीकरणासाठी फेसलेस सेवाचे मोड्यूल विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत परवाना नूतनीकरण आता फेसलेस होणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अश्विनी स्वामी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

परिवहन मंडळाच्या डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट परीवहन डॉट जीओव्ही डॉट इन संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन परमिट ही सेवा निवडावी. त्याला आधार लिंक किंवा मोबाईल नंबर या दोनपैकी एक मार्ग निवडून पुढील पेजवर जावे. त्यानंतर परवान्याशी निगडित सेवा निवडणे व ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे. या संकेतस्थळावर आधार कार्ड, वित्तबोजा नाहरकत प्रमाणपत्र, पीयूसी, व्यवसाय कर पावतीचे दस्तावेज अपलोड करावेत. त्यानंतर सेवा शुल्क भरावा लागणार आहे.  

रिक्षा, टॅक्सीच्या परवाना नूतनीकरणासाठी परवाना मालक यांना नूतनीकरणावेळी संबंधित नोंदणी प्राधिकारी यांच्या समोर स्वाक्षरी करावी लागणार आहे. याबाबत संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे ठराव झाले आहेत. तथापि, नवीन फेसलेस परवाना नूतनीकरण कार्यपद्धतीनुसार आधार ऑथेन्टिकेशनद्वारे परवानाधारकाची खात्री झाल्यामुळे पुन्हा अर्जदारास कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही. तसेच जर वाहनावर वित्त बोजा असल्यास, परवाना धारक ऑनलाईन पद्धतीने सदर बँकेची नाहरकत जोडू शकतो.  त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये आधार ऑथेन्टिकेशन झाल्यामुळे व नाहरकतची मूळ प्रत, खरेपणाची पूर्ण जबाबदारी अर्जदाराची असल्यामुळे अपलोड केलेली अर्जदाराची कॉपी ग्राह्य धरण्यात येईल व अर्जदाराला कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही.

मोबाईल ओटीपीद्वारे अर्जदाराने परवाना नूतनीकरणाचा अर्ज सादर केला असल्यास त्याला जुन्या पद्धतीप्रमाणे मूळ कागदपत्रे सादर करण्यासाठी कार्यालयात यावे लागेल. ही कार्यपद्धती कार्यान्वित करण्यात येत असून फेसलेस पद्धतीने प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचा २ दिवसांत निपटारा करण्यात येईल. त्यामुळे या सेवांचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती स्वामी यांनी केले आहे.....  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या