🌟परभणी जिल्ह्यातील प्रत्येक शेतकर्‍यास हक्काचा पीकविमा मिळवून देवू - डॉ.सुभाष कदम


🌟जिल्ह्यात 21 ठिकाणी पर्जन्यमान यंत्रच चूकीच्या ठिकाणी बसविल्या गेल्याने नोंदी व्यवस्थित झाल्या नाहीत🌟

परभणी (दि.25 आगस्ट 2023) : जिल्ह्यातील 52 महसूल मंडळात पावसाचा मोठ्या प्रमाणावर खंड होता. तुटवडा होता. परंतु, काही मंडळांना किरकोळ तांत्रिक अडचणी तर काही मंडळांना निकषातच बसत नसल्याने सोयाबीन या पीकापोटीचा नुकसान भरपाईच्या 25 टक्के अग्रीम रक्कम मिळणार नाही, असे चित्र उद्भवले असून या सर्व मंडळांसाठी पुढच्या काळात भक्कम असा पाठपुरावा करीत प्रत्येक शेतकर्‍यांना हक्काचा पीकविमा मिळवून देण्याकरीता आपण प्रयत्न करु, असा विश्‍वास भारतीय जनता पक्षाचे नेते तथा पीक विमा चळवळीतील अग्रेसर कार्यकर्ते डॉ. सुभाष कदम यांनी दिलासाशी बोलतांना व्यक्त केला.

           या जिल्ह्यात बहुतांशी मंडळात पावसाचा मोठा खंड आहे, तुटवडा आहे परंतु, पीकविमा कंपन्यांच्या नियमावलीप्रमाणे, कराराप्रमाणे 21 दिवसांचा खंड म्हणजेच 2.5 मिली मीटरपेक्षा कमी पाऊस असणार्‍या मंडळांना संभाव्य विमा नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के आगावू रक्कम मिळणे हे अपेक्षित आहे. मात्र, या जिल्ह्यात बहुतांशी मंडळांना अगदी किरकोळ कारणांमुळे 25 टक्के अग्रीम रक्कमेपासून वंचित रहावे लागेल, असे चित्र दिसत आहे. कारण काही मंडळात मोठ्या खंडानंतर म्हणजे 20 दिवसांनंतर 21 व्या दिवशी एकाच दिवशी 3 मिली मीटर पाऊस झाला. तर काही मंडळात 2.8 मिली मीटर असा पाऊस झाला. हा पाऊस खरीप पिकांकरीता, सोयाबीनकरीता उपयुक्त नाही, हे स्पष्ट आहे. परंतु या किरकोळ तांत्रिक कारणांमुळे या मंडळांना या लाभापासून वंचित रहावे लागणार आहे, असे डॉ. कदम यांनी नमूद केले.

          जिल्ह्यात 21 ठिकाणी पर्जन्यमान यंत्रच चूकीच्या ठिकाणी बसविल्या गेल्याने नोंदी व्यवस्थित झाल्या नाहीत. त्यापैकी 18 ठिकाणी यंत्र योग्य पध्दतीने बसविल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु, 3 ठिकाणी अद्यापही चूकीच्याच ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र कार्यरत आहेत. त्यामुळे त्याही कार्यक्षेत्रात पीक विम्याच्या रक्कमांपासून शेतकर्‍यांना वंचित रहावे लागणार, अशी खंत डॉ. कदम यांनी व्यक्त केली. या सर्व पार्श्‍वभूमीवर पुढच्या काळात भक्कम असा पाठपुरावा करीत प्रत्येक मंडळातील प्रत्येक शेतकर्‍यांना त्यांचा हक्काचा पिक विमा मिळवून देण्यासाठी निश्‍चितच प्रयत्न केले जातील, असा विश्‍वास कदम यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या