🌟परभणी जिल्ह्यातील लम्पी नियंत्रित असलेले सतर्क क्षेत्र घोषित - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟लम्पी चर्मरोग प्रादुर्भावासंदर्भात जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न 🌟    

परभणी (दि.२६ ऑगस्ट, २०२३) : प्राण्यांमधील संक्रामक आणि सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार लम्पी चर्मरोगाबाबत संपूर्ण परभणी जिल्हा लम्पी आजाराबाबत सतर्क क्षेत्र असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी घोषित केले आहे. 

महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री बाळासाहेब विखे यांच्या आणि कृषि पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग, पशुसंवर्धन आयुक्तांच्या आदेशानुसार लम्पी चर्मरोग प्रादुर्भावासंदर्भात नुकतीच जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  

लम्पीवर नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निर्मूलन करण्यासाठी गोजातीय प्रजातीची सर्व गुरे ज्या ठिकाणी पाळले जातात त्या ठिकाणापासून दूर ठेवावेत किंवा त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील अथवा क्षेत्राबाहेरील दूर ठेवावीत किंवा त्यांचे अन्य कोणत्याही ठिकाणी वहन करता येणार नाही. ज्या पशुंचे  28 दिवसांपूर्वी लसीकरण झाले नाही, त्यांची वाहतूक करता येणार नाही. गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे, गोजातीय प्रजातीच्या कोणत्याही बाधीत झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि बाधित प्राण्यांचे शव कातडी, त्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी नियमित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.

गोजातीय प्रजातीच्या बाधीत पशुधनास स्वतंत्र ठेवणे व अबाधित पशुधनास वेगळे बांधणे तसेच या रोग प्रादुर्भावाने मृत्यू झाल्यास त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी. बाधित परिसरात स्वच्छता व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करून घ्यावे. रोग प्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माशा, गोचिड इत्यादीच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करावी. लम्पीचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगर पंचायती, नगर परिषद व महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रात भटक्या, मोकाट पशुधनाचे नियमित निरीक्षण करावे तसेच पशुधनाची काळजी घ्यावी व जनावरांचे गोठे व त्यालगतच्या परिसरात किटकनाशकाची फवारणी मोहीम स्वरुपात राबविण्यात यावी. पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने सदर जनावरांचे लसीकरण करून त्यांचे स्थलांतर नजीकच्या कोंडवाडा, गोशाळेत करावे. 

बाधित पशुधनाची वाहतूक केल्यामुळे निरोगी पशुधनास या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने सीमेवरील तपासणी नाका येथे पशुंची तपासणी करण्याच्या तसेच बाधित पशुधन  जिल्ह्यात येणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच वाहतुकीदरम्यान ज्या गोवर्गीय पशुंचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण 28 दिवसांपूर्वी झालेले नाही अशा गोवर्गीय पशुंच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत आहे. जिल्ह्यांतर्गत गोवर्गीय जनावरांची खरेदी-विक्री, बाजार, प्रदर्शन, शर्यती आयोजित न करण्याबाबत आदेशीत करीत आहे. बाधित क्षेत्रातील पशुधनावर उपचार करणे, त्याचप्रमाणे गोवर्गीय पशुधनाचे प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम स्वरुपात हाती घेऊन उर्वरीत गोवर्गीय पशुधनाचे लसीकरण तात्काळ पूर्ण करावे. योग्य त्या जैवसुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यांत यावी.

या रोगाबाबत विविध माध्यमातून जनजागृती व माहिती पशुपालकांपर्यंत पोहचविण्यात यावी. लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाबाबत नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती व जिल्हास्तर येथे संबंधित पशुपालकांनी इतर कोणतीही व्यक्ती शासनेत्तर संस्था किंवा ग्रामपंचायत यांनी त्वरीत माहिती देणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये उपरोक्त कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था प्रतिनिधीविरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करणे तसेच कारवाई प्रस्तावित करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच हे आदेश निर्गमित केल्याच्या तारखेपासून पुढील आदेश पावेतो अंमलात राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी सांगितले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या