🌟पती-पत्नीस रस्त्यावर अडवून जबरी चोरी करणारे ०३ चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.....!


🌟गुन्ह्यातील मोबाईल व रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त🌟

फुलचंद भगत

वाशिम :- समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून नागरिकांच्या मालमत्तेची चोरी/नुकसान करणाऱ्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाते. नुकतीच सासरवाडीवरून पत्नीस घेऊन घरी जाणाऱ्या इसमास रस्त्यावर अडवून दमदाटी करून त्यांचेकडून जबरदस्ती पैसे हिसकून मोटारसायकलने पळ काढणाऱ्या चोरट्यांना अटक करून सदर गुन्हा उघड करून त्याच आरोपींकडून हिंगोली जिल्ह्यातील पो.स्टे.हिंगोली ग्रामीण अप.क्र.३७९/२३, कलम ३९२ भादंवि हा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश प्राप्त झाले आहे.

          दि.१९.०८.२०२३ रोजी ग्राम शिवणी दलेलपूर ता.मंगरूळपीर जि.वाशिमचे रहिवाशी असलेले फिर्यादी श्री.अजित जगनराव भेंडेकर, वय २७ वर्षे, व्यवसाय - शेती हे त्यांच्या सासरवाडीवरून (ग्राम येडूत, ता.कळमनुरी, जि.हिंगोली) आपल्या पत्नीस घेऊन गावी परतत असतांना रात्री अंदाजे ०७.५५ वाजता राजगाव - अनसिंग रोडवर एका बिना नंबर प्लेट पल्सर कंपनीच्या मोटार सायकलने आलेल्या तिघांनी दमदाटी करून जबरदस्तीने पैसे, मोबाईल व मो.सा.ची चाबी लुटून नेण्याचा प्रकार घडला होता. सदर प्रकरणी पो.स्टे.वाशिम ग्रामीण येथे अप.क्र.३८३/२३, क.३९२ भादंवि नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास करत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे व आपले तांत्रिक तपास कौशल्य पणाला लावून आरोपी निष्पन्न केले व ग्राम लाखी, ता.पुसद, जि.यवतमाळ येथील आरोपी नामे १) नवनाथ विजय चव्हाण, २) अमर रामदास धुमारे, ३) प्रशांत भीमराव वाणी असे एकूण ०३ आरोपी ताब्यात घेत सदर गुन्हा उघडकीस आणला असून आरोपींकडून गुन्ह्यातील मोबाईल व रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह(IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.रामकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक सपोनि.रमाकांत खंदारे, पोना.प्रशांत राजगुरू, ज्ञानदेव मात्रे, पोशि.विठ्ठल महाले, दीपक घुगे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी पार पाडली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या