🌟‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन : तब्बल 1200 लाभार्थ्यांना देणार लाभ🌟 

परभणी (दि.25 ऑगस्ट, 2023) :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरात होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. 

पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी राहुल देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तु शेवाळे, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.‘शासन आपल्या दारी’ उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील विविध विभागामार्फत 1 एप्रिल 2023 ते आजपर्यंत तब्बल 8 लक्ष 74 हजार 738 लाभार्थ्यांना 1446 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला असून, या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अंदाजे 17 हजार 600 लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात विविध विभागाच्या 20 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहेत. विविध दालनांमध्ये 1200 लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात येतील. लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 400 बसेसची व्यवस्था करण्यात आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात शासकीय योजनेचा लाभ वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी दिली. 

ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांचे लाभ एकाच छताखाली उपलब्ध व्हावेत, यासाठी राज्य शासन 15 एप्रिलपासून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबवित आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार गरजू नागरिकांना लाभ देण्याचा शासनाचा मानस आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन केल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी यावेळी दिली. 

जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाच्या विविध कामासाठी 23 पेक्षा जास्त नोडल अधिकारी व त्यांना सहाय्य करण्यासाठी 82 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. तसेच प्रत्येक उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय व इतर शासकीय, निमशासकीय कार्यालयाने त्यांच्या स्तरावरुन अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. 

तसेच पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून 7 पोलीस उपअधीक्षक, 120 पोलीस  अधिकारी आणि साडेआठशेवर पोलीस अंमलदारांचा बंदोबस्त ठेवला आहे. तसेच कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी नियोजित ठिकाणाहून सकाळी 10:30 पर्यंत पोहचण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी यावेळी केले आहे. 

कार्यक्रमस्थळी जिल्हा व तालुका स्तरावर विविध संपर्क अधिकारी, समन्वयकांच्या नेमणुका केल्या आहेत, त्यामध्ये बैठक व्यवस्था, पाणी पुरवठा व स्वच्छता, प्रसिद्धी, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, स्वागत व्यवस्था, मंडप व्यवस्था व विविध कक्ष, निवास व भोजन कक्ष, विद्युत पुरवठा कक्ष, मुख्य कार्यक्रम समन्वय पथक, वृक्ष लागवड व वितरण कक्ष, आरोग्य पथक, बस व्यवस्था, वाहतूक नियंत्रण पथक इ. पथके गठीत करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी सांगितले.

तसेच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना देण्यात येणारी निवेदने स्विकारण्यासाठी कार्यक्रमस्थळी स्वतंत्र मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे व त्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अभियानासाठी पासेस देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शासकीय विभागातील विविध योजनांची माहिती देण्यासाठी साधारण 80 दालन कार्यक्रमस्थळी उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येकी एक याप्रमाणे रोपटे देत वृक्षारोपण करत पर्यावरण रक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले.  

* एकूण 8 ठिकाणी असेल वाहतूक व्यवस्था :-

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विविध ठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था 8 ठिकाणी करण्यात आली आहे. खाजगी चारचाकी वाहन व्यवस्था- शेतकरी भवन आणि प्रशासकीय इमारत परिसर, दुचाकी वाहनांसाठी महादेव मंदिर परिसर तर जीप, क्रुझर आदी चारचाकी वाहनांसाठी देवगिरी वसतिगृह परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे. 

परभणी, मानवत, सोनपेठ तालुक्यातील लाभार्थ्यांच्या बसकरिता वैद्यनाथ वस्तीगृह मैदानावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तर जिंतूर, सेलू व पाथरी तालुक्यातील लाभार्थी घेऊन येणारी बस वाहने पशु वैद्यकीय कॉलेज मैदानावर उभी करण्याची सोय करण्यात आली आहे. गंगाखेड, पालम व पुर्णा तालुक्यातील लाभार्थ्यांना घेऊन येणाऱ्या बस अॅग्रोनॉमी विभाग समोरील पार्किंग येथे करता येती. व्हीआयपींच्या वाहनांसाठी कृषी महाविद्यालय समोरील परिसरात पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. 

* तालुकानिहाय येणाऱ्या वाहनांसाठी मार्ग :-

जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून येणा-या बसेस व वाहनाची संख्या विचारात घेता वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी तालुकानिहाय मार्ग निश्चित करण्यात आले  असून, ते खालीलप्रमाणे असतील. 

जिंतूर, सेलू व पाथरी तालुक्यातील वाहनांसाठी उड्डाणपूल अनुसया टॉकीजच्या पाठीमागून नियोजित ठिकाणी जाता येणार आहे. त्यांची साखला प्लॉट रोड, ज्वार संशोधन केंद्र, पशु वैद्यकीय ग्राउंड पार्किंग व भोजनव्यवस्था करण्यात आली आहे. 

परभणी, मानवत व सोनपेठ तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी काळी कमान वैद्यनाथ वसतिगृह पार्किंग व भोजनव्यवस्था करण्यात आली आहे. गंगाखेड, पालम व पुर्णा तालुक्यातील लाभार्थ्यांना घेऊन येणाऱ्या वाहनांसाठी सिंगणापूर ताडकळस रोडवरील लोहगाव पासून सायाळा खटिंग डेअरी फार्म महादेव मंदिर - ॲग्रॉनॉमी रोड (निलगिरी रोड) येथे पार्किंग व कृषि महाविद्यालयाच्या पाठीमागे भोजनव्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी सांगितले...... 

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या