🌟 वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षकांना राखी बांधून विद्यार्थिनींनी साजरा केला रक्षाबंधन सण.....!


 🌟समाजाच्या रक्षकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता🌟


✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी, कायद्याचे राज्य अबाधित राहावे व समाजाचे रक्षण करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून त्याची पोचपावती म्हणून शालेय विद्यार्थिनींनी आज पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथील पोलीस अधिकारी व अंमलदार बांधवांना राख्या बांधून खऱ्या अर्थाने रक्षाबंधन सण साजरा केला.


रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधून आपल्या भावाकडून प्रत्येक संकटात आपल्या रक्षणाची हमी घेत असते. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनही महिला व मुलींच्या सक्षमीकरण व सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत असते. त्यामुळे आपल्या समाजाच्या रक्षणाची जबाबदारी उचलणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून दि.३०.०८.२३ रोजी वाशिम शहरातील राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, वाशिमच्या वर्ग ११ व १२ विच्या विद्यार्थिनींनी सामाजिक कार्यकर्ते शुभम मुडे व आनंद बिटोडकर यांच्या नैतृत्वाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथे भेट देऊन मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, पोनि.रामकृष्ण महल्ले, पोनि.प्रवीण धुमाळ, पोनि.पितांबर जाधव यांना व कार्यालयातील सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार व मंत्रालयीन अधिकारी/कर्मचाऱ्यांना राख्या बांधत उत्साहाने ‘रक्षाबंधन सण’ साजरा केला.


यावेळी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (भा.पो.से.) यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांना करिअर, स्वसंरक्षण व ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम घेण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर वाशिम पोलीस दलामार्फत महिला व विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी व रक्षणासाठी राबविण्यात येत असलेल्या निर्भया पथक, DIAL 112, भरोसा सेल, सायबर सेल ‘सायबर सेफ वूमन’ आदी उपक्रमांबद्दल माहिती दिली. त्यावेळी विद्यार्थिनींना जनजागृतीपर माहिती पुस्तिकांचे वितरण करण्यात आले.

वाशिम पोलीस दलाने सुरु केलेल्या सायकल पेट्रोलिंग, डायल 112 व निर्भया पथकामुळे विद्यार्थिनींना सुरक्षित वाटत असून त्यांच्यामध्ये पोलीस दलाप्रती कृतज्ञतेची भावना असल्याचे मत विद्यार्थींनी व्यक्त केले व भावासारखेच रक्षणासाठी सदैव पाठीशी उभे असल्याबद्दल वाशिम पोलीस दलाचे आभार मानले......

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या