🌟रक्षाबंधन- राखी- श्रावण पौर्णिमा विशेष : माझ्या भावा अगा; समजू नगा फक्त रेशिम धागा.....!


🌟स्त्रीहक्क आणि स्त्रीला वरवर सन्मान देणाऱ्या आतल्या गाठीच्या लोकांना तिचे महत्त्व कळत नाही🌟

बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते व आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ प्रेम, पराक्रम, सय्यम आणि साहस हे आहेत. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं असतं. पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे. स्त्रीसन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला उपदेश होय. फक्त स्त्रीहक्क आणि स्त्रीला वरवर सन्मान देणाऱ्या आतल्या गाठीच्या लोकांना तिचे महत्त्व कळत नाही- 

     "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:| 

      यात्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:||"

ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा, म्हणजेच मान-सन्मान, सत्कार होतो, तेथे सुशील, गुणी व उत्तम मुलं होतात व जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही. हा विचार लहानपणापासून समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न या सणाद्वारे केला जातो.

     हिंदू बांधवांच्या पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पोर्णिमेस राखी बांधावी, असे हिंदू धर्मशास्त्रात म्हटले आहे. या विधीस पवित्रारोपण असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही या मागची मंगल मनोकामना असते. राखी या शब्दातच रक्षण कर- राख म्हणजे सांभाळ हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.

     उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो, अशी कामना करते. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे होय. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे होय. काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना आणि पत्नी आपल्या नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे व माणुसकी जिवंत ठेवणे, हीच यामागची भावना आहे. भारतीय समाजात ऐक्‍य आणि प्रेमभाव वाढीस लागावा, यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो. या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतातच शिवाय त्या बंधुत्वसमान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात. या श्रावण पौर्णिमेला पोवती पौर्णिमा असेही म्हणतात. कापसाच्या सुताच्या नवसुती- नऊ धाग्यांची जुडी करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात. त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.

     श्रावण पोर्णिमेसच श्रावणी असे देखील म्हटले जाते. पूर्वी पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करत असत. तर कुमारांना शिक्षण घेण्यास सुरुवात करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जात असे. अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याचे शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे श्रावणी साजरी करणे होय. श्रवण नक्षत्रावर श्रावणी करतात. हा सण म्हणजे बहिण भावाचे अतूट नाते दाखवतो. रक्षाबंधनच्या सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. जैन लोक हा दिवस रक्षापर्व म्हणून पाळतात. त्या दिवशी जैन मंदिरात राख्या ठेवलेल्या असतात. जैन मुनी त्यांचे आदराने ग्रहण करतात. उत्तर भारतात नोकर मालकाच्या हाताला राखी बांधतात.

     विधीचा प्रयोग असा- सूर्योदयी स्नान करतात. उपाकर्म करून ऋषींचे तर्पण करतात अपराह्नकाळीं राखी तयार करतात. तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधल्याने रक्षा अर्थातच राखी तयार होते. मग तिची पूजा करतात. नंतर पुढील मंत्राने ती राखी बांधतात- 

     "येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:। 

     तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल॥" 

अर्थ- महाबली दानवेंद्र बळिराजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधते. हे रक्षे, तू चलित होऊ नकोस. यावरून मूळचे हे बंधन राजासाठी होते असे कळते. आज या सणाला स्वार्थाचे लिंपण लागलेले दिसते. मालदार किंवा श्रीमंत व्यक्ती बघून महिला त्यास राखी बांधतात. सख्खी बहीणही असेच मानले पाहू लागली आहे. आईबापाच्या इस्टेटीतून भाऊहिस्सा घेऊ लागली आणि भावालाही तिचा तिरस्कार वाटू लागला, त्यामुळे रक्षाबंधन सणाचे महत्व पूर्वीप्रमाणे राहिलेले नाही. धनसंपत्तीच्या मापाने या सणाला मोजू नये, तर भावाबहिणीचे नाते कसे अतूट व प्रेमळ राहिल, यासाठीच या सणाचे पावित्र्य अबाधित ठेवले जावे.

!! राखी पौर्णिमा निमित्ताने सर्व भावाबहिणींना सप्ताहभर हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

श्री एन. कृष्णकुमार, से.नि.अध्यापक.

 रामनगर- गडचिरोली (७७७५०४१०८६).

           

                     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या