🌟परभणी जिल्ह्यातील 11 मंडळांना विम्याची 25 टक्के अग्रीम रक्कम....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संबंधित पीकविमा कंपनीस दिले स्पष्ट निर्देश🌟


परभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखमीच्या बाबी अंतर्गत जिल्ह्यातील 11 महसूल मंडळातील शेतकर्‍यांच्या खात्यात सोयाबीन या अधिसूचित पीकासाठी ‘आयसीआयसीआय लॉबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ यांनी संभाव्य विमा नुकसान भरपाईच्या रक्कमेच्या 25 टक्के आगावू रक्कम जमा करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शुक्रवार दि.25 आगस्ट 2023 रोजी दिले आहेत.

            दरम्यान, या आदेशाप्रमाणे जिंतूर, केकरजवळा, पेठशिवणी, रावराजूर, दैठणा, सिंगणापूर, पाथरी, बाभळगाव, लिमला, ताडकळस व सेलू या महसूल मंडळांतर्गत शेतकर्‍यांना सोयाबीन या अधिसूचित पिकासाठी 25 टक्के अग्रीम रक्कमेचा मार्ग मोकळा झाला आहे.

           प्रतिकूल परिस्थिती उदा. पूर, पावसातील खंड, दुष्काळ, कीड व रोगाचा प्रादुर्भाव या बाबीमुळे अधिसूचित महसूल मंडळ, महसूल मंडळ गट, तालुक्यांमध्ये शेतकर्‍यांच्या चालू वर्षाच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गत सात वर्षातील सरासरी उत्पादनांच्या तूलनेत 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर येणार्‍या पीकविमा नुकसान भरपाईच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत शेतकर्‍यांना आगावू रक्कम देण्याची तरतूद आहे.

           जिल्ह्यातील हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे 50 टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेली पीकनिहाय, महसूलमंडळ निहाय अपेक्षित उत्पादन व मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनांची माहिती या आधारे जिल्हा प्रशासनाने पीक विमा क्षेत्रातील सोयाबीन या अधिसूचित पीकासाठी संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के आगावू रक्कम विमाधारक शेतकर्‍यांना अदा करावी, असे आदेश प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या जिल्हास्तरीय संयुक्त समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी गावडे यांनी काढले आहेत. या आदेशाप्रमाणे सोयाबीन या अधिसूचित पिकासाठी महसूल मंडळ जिंतूर, केकरजवळा (ता.मानवत), पेठशिवणी व रावराजुर (ता.पालम), दैठणा, सिंगणापूर (ता.परभणी), पाथरी, बाभळगाव (ता.पाथरी), लिमला व ताडकळस (ता.पूर्णा) तसेच सेलू या 11 महसूल मंडळातील विमाधारक शेतकर्‍यांना मागील सात वर्षांची सरासरी उत्पादकता, संयुक्त सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादन, सरासरी उत्पादनाच्या तूलनेत येणारी घट ओळखून संभाव्य पीक विमा नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के आगावू रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या