🌟वृत्तदर्पण : बाईपण भारी देवा.....!


🌟अगंबाई अरेच्चा’ सिनेमानंतर १९ वर्षांनी केदार शिंदे यांनी ‘बाईपण भारी देवा’ हा बाईपणाला समर्पीत सिनेमा स्क्रिनवर आणला🌟

🌟वृत्तदर्पण : ✍️ राजेंद्र काळे 

 बाई अन् माणसात काही फरक असतो की नाही, हे अदिती तटकरेंच्या बाबतीतलं शिवसेना आमदार भरत गोगावले यांचं वक्तव्य.. मागे संभाजी भिडे यांनी सुध्दा टिकलीवरुन बाईपणाला डिवचले होते. असे काहीसे प्रकार बाईपणाच्या बाबतीत महाराष्ट्र, भारतात नाहीतर जगभरात होत राहतात. तरीही महिलांनी त्यांच्या कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावण्याचे काम सातत्याने सुरु ठेवले आहे. विविधांगी क्षेत्रात ज्या पध्दतीने महिला पुढे जात आहेत, त्यातही बाईपणाला कमी लेखण्याची पुरुषी मानसिकता कुठे गोगावले म्हणा वा अन्य रुपाने दिसत असतांना साहित्य-क्रीडा वा चित्रपट क्षेत्रात असे काही घडते की, त्यामुळे परिस्थिती बदलून जाते. सध्या सर्वच बायकांमध्ये हवाच नाहीतर लाट आलीयं ती, बाईपण भारी देवा!_

बाईपण ही साधारणत: कमजोरी समजल्या जाण्यार्‍या काळातच, याच बाईमध्ये बीजधारणेचा गुण असल्याने तिच्यामध्येच या धरणीला सुजलाम् सुफलाम करण्याची क्रांतीकारी शक्ती असल्याचं जाणवलं. स्त्री अन् पुरुष ही संसाराची दोन चाक असलीतरी, रथाचा तोल सावरल्या जातो तो केवळ बाईपणामुळेच. खरंच बाईपण भारीच असतं, सर्व जबाबदार्‍या सांभाळत काम करत राहणं अन् आयुष्याच्या एका टप्प्यावर म्हणजे जवळपास अर्ध आयुष्य जगून झाल्यावर घरकाम करणारी असो की नोकरी करणारी वा एखादी उद्योजक महीला.. त्यांच्या मनात या जबाबदार्‍या पेलता पेलता ‘अरे जगणं तर राहूनच गेलं..’ ही भावना निर्माण होवून ऐकमेकींप्रतीची असुया-राग-द्वेष-समज अन् गैरसमज दूर करुन मंगळगौर सारख्या छोट्याशा सेलीब्रेशनमधून का होईना जगण्याचं निखळ आनंद घेणं.. व यातूनच हसत-बागडत-वाजत-गाजत व नाचत ‘स्वप्न रोज तासून तू ठेवतेस गाडाभर, जीव तुझा भात्यापरी रोज होई खालीवर.. ठिणगीला भिडणारी अक्कल, बाईपण भारी देवा- बाईपण भारी रं..’ अशा पद्धतीनं अव्यक्त भावना ह्या व्यक्त करणं, हीचतर बाईपणाची भारी कमाल!..

हिच कमाल एका मराठी चित्रपटाच्या माध्यमातून केली ती केदार शिंदे या दिग्दर्शकाने. ‘अगंबाई अरेच्चा’ या सिनेमानंतर १९ वर्षांनी केदार शिंदे यांनी ‘बाईपण भारी देवा’ हा बाईपणाला समर्पीत सिनेमा सिल्वर स्क्रिनवर आणला. पुरुषानं बाईच्या मनातील ऐकून घेणं अन् तिचं  बाईपण समजून घेण्याचा प्रयत्न करणं, हा धागा पकडून बाईपणाच्या सप्तरंगी कथेची गुंफन कुठलाही गुंता न करता अगदी सहज साध्या पद्धतीने सर्वसामान्य कुटूंबांना पुढे ठेवून या चित्रपटातून करण्यात आली आहे. म्हणूनच महाराष्ट्रासह बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक मल्टीप्लेक्समध्ये सर्वच स्तरातील महीलांची गर्दी त्यांच्यातील बाईपणाला शोधण्यासाठी सर्वच शहरांमध्ये होत असल्याचे दिसत आहे.

वास्तविकत: बाईपण समजून घेण्यासाठी पुरुषांनी हा चित्रपट पाहणे गरजेचे असतांना, बायकांचा चित्रपट म्हणून संबोधणं वा हिणवणं.. या प्रकारातून महिलांच्या तुलनेत पुरुष मंडळीची या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचेच दिसते. तरीसुध्दा केवळ महिलांच्या भरवशावर हा चित्रपट मराठी असूनही चालतांना नव्हे तर पळतांना दिसत आहे. जयाच्या भूमिकेतील रोहीणी हटंगडी, शशीच्या भुमिकेत वंदना गुप्ते, साधना साधतांना सुकन्या कुळकर्णी, पल्लवीला पल्लवीत करणारी सुचित्रा बांदेकर, केतकीच्या बनात डोलणारी शिल्पा नवलकर अन् चारुच्या भूमिकेत रसीकमनांचा ठाव घेणारी दिपा परब.. तशा या चाळीशी पार केलेल्या ६ बहीणी, मूळातच कसलेल्या कलावंत.. त्यामुळे कुठल्याही पुरुष अभिनेत्याविना हा सिनेमा सहजतेनं खेचून नेतात.

‘बाईपण भारी देवा..’ हे शिर्षकगीत मध्ये-मध्येच भारी फिल देवून जाते, अन् ‘मंगळगौरी’चं गाणंतर भन्नाटच, अन् त्यातील पारंपारीकतेला आधुनिक साज देणारे नृत्यही अफलातून.  मराठमोळ्या रसीकांची नाडी अचूक ओळखून, हसता-हसता रडविणारा तर रडता-रडता हसविणारा, बाईपणाच्या वेदनेचं संवेदनशील चित्रण करत असतांना बाईला स्वत:साठी जगण्याची स्वतंत्र प्रेरणा देणारा, वर्षातील ३६४ दिवस ‘स्ट्रेसफुल’ जगायचं, की ३६५ दिवस ‘स्ट्रेसफ्री’ जगायचं.. यासाठी मोठा आनंद शोधण्यापेक्षा छोट्या-छोट्या आनंदासाठी वेळ काढणं, हे तमाम महीलांना शिकवून जाणारा हा चित्रपट.. भिन्न मानसिकतेच्या विभिन्न परिस्थीतीतील महिलांचं भावविश्व रेखाटतांना स्वत:साठी श्वास घेण्याकरीता प्रेरणा देणारा हा चित्रपट म्हणूनच महीलांसाठी गर्दी खेचत आहे. बुलडाणा जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे महानगरीय नसून ग्रामीण असतांनाही, भावनिक पदर उलगडविणारा हा चित्रपट ठरत असल्यामुळे म्हटलं जातयं.

* बाईपण भारी देवा : भारीच :-

बाईपण भारी देवा.. याची साक्षात अनुभूती आली, ती ‘चंद्रयान-३’च्या यशस्वी उड्डाणानंतर. या सफल अशा अंतराळ मोहीमेचं नेतृत्व केलंय ते ऋतू श्रीवास्तव या बाईनं. मंगलयान मोहीमेत अपयश येवूनही खचून न जाता, ही बाई पदर खोचून पुन्हा ‘चंद्रयान-३’साठी अंतराळाच्या मैदानात उतरली.. अन् कर्तृत्वाच्या अथांग आकाशात तिच्या प्रयत्नांनी झेप घेतली अन् खरंच चंद्रयान झेप घेतांना, ‘ऋतू’पुढे झाले ते आभाळ ठेंगणेच!

‘चंद्रयान ३’ चे यशस्वी लॉन्चींग श्री हरिकोटो स्थित सतिश धवन स्पेस सेंटरवरुन झाले, अन् शुक्रवार १४ जुलै रोजीच्या दुपारी २.३५ वाजता तमाम भारतीयांची मान अभिमानानं आकाशाकडे झेपावली. या मोहिमेला प्रâंटवरुन लीड करणारी ‘रॉकेट वुमन’ होती ती स्पेस साइंटीस्ट ऋतू करीधाल श्रीवास्तव. चंद्रयान ३ च्या उड्डाणाचा भार ऋतूने आपल्या खांद्यावर पेलला. मंगलयान मिशन, चंद्रयान २ मिशन यातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती. एयरोस्पेसमध्ये अनेक उपलब्धी त्यांच्या नावावर आहे. सन २००७ मध्ये त्यांना डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्याहस्ते ‘यंग साइंटीस्ट अवार्ड’ने सन्मानित केल्या गेले होते. ऋतू श्रीवास्तव मूळ लखनौच्या, नवयुग कन्या महाविद्यालयातून शिकत असतांना त्यांनी भौतिकशास्त्रातून मास्टर डिग्री घेतली. ६ महिन्यांच्या संशोधनानंतर त्यांनी बाग गेट क्लेयर करुन विज्ञान व अंतराळ या ओढीतून बेंगलुरुच्या भारतीय विज्ञान संस्थेत प्रवेश घेतला आणि १९९७ मध्ये इस्त्रो’ मध्ये नोकरीला आरंभ करुन अवकाश निवडले.

ऋतू पलटविण्याची क्षमता ऋतू श्रीवास्तव यांच्यात प्रकर्षाने दिसते. संसारात एखादी महिला एखाद्या बाबीमध्ये खचून गेलीतरी ती नव्या उमेदीने उभी राहते, याच उभारीचे पर्यायाने भरारीने नावे म्हणजे ऋतू  श्रीवास्तव. याच बाईमुळे बाईपणाच्या झेपावणार्‍या कक्षा या किती विस्तीर्ण असतात, या कर्तृत्वशील स्त्रीत्वाच्या पंखाची जाणीव जगाला झाली. अंतराळात भारतातून झेपावणारी पहिली महिलाच होती, ती कल्पना चावला.. अग्नीपंख लावून झेपावलेली ‘ती’ अग्नीकन्या मात्र दुर्दैवाने काळाने हिरावून घेतली. तरीही महिलांनी ‘झेप’ घेण्याचे सोडले नाही. त्यातलाच ऋतू श्रीवास्तव.. चंद्रयानच्या निमित्ताने ठरल्या ऋतू श्रीवास्तव, भारीच.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या