🌟परळी-मलकापूर-मरळवाडी-मांडवा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम झाले बोगस....!


🌟भ्रष्ट गुत्तेदार/अधिकार्‍यांच्या संगनमत शासनाला चुना : चौकशी करून कारवाई करा अन्यथा आंदोलन - देवराव लुगडे महाराज


परळी वैजनाथ (दि.२१ जुलै २०२३) - परळी वैजनाथ - मलकापूर - मरळवाडी - या रस्त्यावरील खड्डे बुजविणे व दुरुस्तीचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. शासनाचे लाखो रूपये अक्षरशः मातीत गेले असुन दुरूस्ती अगोदरचाच रस्ता चांगला होता अशी म्हणण्याची वेळ नागरीकांवर आली आहे. दरम्यान या निकृष्ठ कामाची तातडीने चौकशी करून गुत्तेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

       सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर अनेक गावची वर्दळ आहे. तसेच शाळकरी विद्यार्थी आणि दूध विक्रेते या रस्त्याचा वापर करतात. या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडुन वाहतूकीला अडचणी येत असल्याने या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी नागरीकांनी केली होती. म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरूस्तीचे व खड्डे बुजविण्याचे काम केले. लाखो रुपये या कामावर खर्च झाल्याचे कागदोपत्री दाखवून गुत्तेदाराने पैसे उचलून घेतले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

        उन्हाळ्यात केलेले काम न झालेल्या पावसाने वाहुन गेले आणि रस्ता पहिल्यापेक्षा खराब झाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी तळे साचले असुन खडी उघडी पडल्याने वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे विद्यार्थी, दुध विक्रेते आणि नागरीकांचे हाल होत आहेत. संबंधित अधिकारी आणि गुत्तेदारांनी संगनमताने थातुर मातुर काम करून लाखो रुपयांचा अपहार केला असल्याचा आरोप करून परळी वैजनाथ - मलकापूर - मरळवाडी - मांडवा या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या बोगस कामाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिला आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या