🌟परभणी जिल्ह्यात मतदार नोंदणी,नाव दुरुस्तीसाठी महिनाभर विशेष मोहीम....!


🌟या विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे आवाहन🌟

परभणी (दि.१८ जुलै २०२३): आगामी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन पूर्ण ताकदीने कामाला लागले असून, २१ जुलै ते २१ ऑगस्ट या महिनाभरात नव मतदारांची नावनोंदणी, दुरुस्ती, नाव वगळणे आणि मतदारसंघातील नाव बदलण्याची विशेष मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले आहे.  

राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकारी परभणी यांच्या पत्रान्वये १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्यक्ष घरोघरी भेटी देऊन वरील कालावधीत पडताळणी करणार आहेत. मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यासाठी २२ ऑगस्टपासून या मोहिमेला सुरुवात होणार असून, हे काम २० सप्टेंबरपर्यंत करण्याचे निर्धारित आहे. तसेच १७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत मतदारांना दावे आणि हरकती दाखल करता येणार असून, २६ डिसेंबरपर्यंत निकालात काढण्यात येणार आहेत. तर ५ जानेवारी २०२४ रोजी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

निवडणूक विभागाच्या नियोजित कार्यक्रमानुसार दीड हजारपेक्षा जास्त मतदार असलेले मतदान केंद्र विभाजित अथवा कमी मतदार संख्या असलेल्या जवळच्या मतदान केंद्रात समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. 

मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी मृत, कायमस्वरुपी स्थलांतर केलेल्या मतदारांची नावे वगळणे, तसेच १८ ते १९ वर्ष वयोगटातील नवमतदारांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी करून घ्यायची आहे. मतदार यादीमध्ये महिलांच्या नावनोंदणीचे प्रमाण वाढविणे,‍ दिव्यांग मतदारांना चिन्हांकित करण्यासाठी त्यांच्याकडून नमुना क्रमांक ८ चे अर्ज दिव्यांगांचे प्रमाणपत्र घेऊन भरून घेणे, तसेच मतदार यादीतील चुकीच्या नावांची दुरुस्ती करण्यासाठी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी भेटी देत पडताळणी करणार आहेत. 

तरी सर्व मतदारांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करून मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी नावनोंदणी करावी. मयत मतदारांचे नाव कमी करण्यासाठी अर्ज नमुना क्रमांक ७ भरून द्यावा. मतदार यादीतील नावाच्या व इतर दुरुस्तीसाठी आणि दिव्यांग मतदारांना चिन्हांकित करण्यासाठी नमुना क्रमांक ८ अर्ज भरून देत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी केले आहे. याकामी सहायक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. अमित घाटगे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या