🌟आठ तासांचे व्हिडीओ..पक्षातील महिलांचा छळ ; थेट पेनड्राईव्ह जमा करत विरोधी पक्षनेते दानवेंचा सोमय्यांवर गंभीर आरोप...!


🌟व्हिडीओमध्ये किरीट सोमय्या मराठी स्त्रियांविषयी ज्यापद्धतीने बोलले आहेत ते अतिशय धक्कादायक आहे - अंबादास दानवे


🌟कोणतेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही,देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही🌟

✍️ मोहन चौकेकर

मुंबई :-भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओंमध्ये दिसणारी व्यक्ती अश्लील कृत्य करताना दिसत आहे.लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ प्रसारीत केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभागृहातही उमटले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबतचा एक पेनड्राईव्ह विधानपरिषद उपसभापतींकडे जमा केला. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधानपरिषदेत बोलताना  म्हणाले, “आपलं राज्य फुले, शाहू, आंबेडकर, जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि आहिल्याबाई होळकर यांचं आहे. असं असताना सत्ताधारी पक्षातील काही मंडळी या सगळ्या विचाराला छेद देत असल्याची स्थिती आहे. मी कोणत्या राजकीय पक्षाचं नाव घेत नाही. परंतु काही लोक आहेत, जे ईडी, सीबीआय आणि आयटी विभागाची भीती दाखवतात. या माध्यमातून काही लोकांना ब्लॅकमेलिंग करणं आणि खंडणी गोळा करण्याचं काम केलं जातंय. याबाबतच्या काही बाबी समोर आल्या आहेत.

संबंधित व्यक्ती त्यांच्या पक्षातल्या महिला-भगिनींना पद, जबाबदारी, मंडळं, महामंडळं देतो. माझा ईडी, सीबीआय आणि आयटी अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. अशी भीती दाखवून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करतात. जे राजकीय पक्ष नैतिकतेचे धडे देतात, त्याच पक्षाचा एक मोठा पदाधिकारी असलेल्या व्यक्तीने जे काही केलं आहेत, ते अतिशय धक्कादायक आहे. अनेक महिलांना राज्यसभा, विधानपरिषद आणि महामंडळात नियुक्त्या देतो, असं सांगून ब्लॅकमेलिंग केलं जात आहे,” असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला.

या प्रकरणात गुन्हा करणारी व्यक्ती कोण आहे, कोणत्या पक्षात आहे, हा विषय महत्त्वाचा नाही. ही प्रवृत्ती महत्त्वाची आहे. म्हणून माझ्याकडे काही व्हिडीओज आले आहेत. काही माता-भगिनींनी अतिशय हिंमत करून हे व्हिडीओ माझ्यापर्यंत पोहोचवले आहेत. त्या भगिनींना मी सलाम करेन. कारण हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला केंद्राची सुरक्षितता आहे. या सुरक्षितेचा वापर महिलांकडून खंडणी करण्यासाठी केला जातोय की काय? अशी स्थिती आहे,” असंही विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी नमूद केले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुढे म्हणाले, “संबंधित भाजपा नेत्याने काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला आहे. माझ्याकडे आठ तासांचे व्हिडीओज आहेत. मी ते सभापतींना देणार आहे. हे कृत्य करणारी व्यक्ती महाराष्ट्रद्रोही आहे. विशेषत: मराठी भगिनींना ब्लॅकमेलिंग केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हे राजकीय दलाल, उपरे या महाराष्ट्रात आले आहेत. मराठी माता भगिनींचा छळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या व्यक्तीचं नाव मी स्पष्टपणे घेतो, त्याचं नाव किरीट सोमय्या आहे. त्याने काय-काय केलंय, हे संपूर्ण महाराष्ट्राला समजलं आहे. अशा किरीट सोमय्याला सत्ताधारी पक्ष संरक्षण देणार का? ज्या माता-भगिनींनी टाहो फोडला आहे? त्यावर हे राज्यसरकार काय करणार? किरीट सोमय्यांच्या त्रासामुळे अनेकांनी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला आहे. अनेकांना तुरुंगात जावं लागलं आहे.”

हे किरीट सोमय्या महाराष्ट्रद्रोही आहेत. त्यांचा एक पेनड्राईव्ह माझ्याकडे आहे. यामध्ये अतिशय किळसवाणे व्हिडीओज आहेत. अशा लोकांवर सरकार कारवाई करणार का? याचं संरक्षण काढून घेणार का? की केंद्र सरकारकडून संरक्षण वाढवलं जाणार? याप्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी माझी मागणी आहे. हे पेनड्राईव्ह आपण बघा, यातून राज्य सरकारला निर्देश द्या.या व्हिडीओमध्ये किरीट सोमय्या मराठी स्त्रियांविषयी ज्यापद्धतीने बोलले आहेत, ते अतिशय धक्कादायक आहे. हा पेनड्राईव्ह तुम्हाला सोपवतो. या सगळ्या विषयाचा तपास करावा,अशी विनंती करतो,” अशी मागणी अंबादास दानवेंनी केली.

* खासदार संजय राऊत ट्वीट


खासदार संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की आमच्यावर आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते सांगायचे, जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका. आता नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरंच काही घडणार आहे. जे जे होईल ते पाहत राहावे.. जय महाराष्ट्र!

* “प्रकरण दाबले जाणार नाही”:➖ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


“महिलेची ओळख सांगता येत नाही. तपासासाठी पोलिसांना महिलेची ओळख दिली जाईल. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून महिलेची ओळख पटवतील. महिलेची ओळख आपण जाहीर करत नाही. त्यामुळे ती जाहीर करण्याचा प्रश्नच येत नाही. अशा प्रकारचे कोणतेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

* “महाराष्ट्राची प्रतिमा आता डागाळली” :➖ नाना पटोले


याविषयी नाना पटोले यांनी "या सगळ्या प्रकरणावर काय बोलणार? भाजपाचं राजकारण घाणेरडं झालं आहे. कधी नव्हे ते या गोष्टी समोर येत आहे. २०१४ ला देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यापासून राजकारणाचा स्तर घसरला आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हे दाखवलं गेलं आहे. महाराष्ट्राची प्रतिमा आता डागाळली आहे. व्हिडीओची सत्यता पडताळल्यानंतरच प्रतिक्रिया देता येईल. मात्र राज्यातल्या सरकारची मानसिकता विचारांना कलंक लावणारी आहे."

* “पुरुषांना चारित्र्य नसतं का ?”:➖ अयोध्या पौळ

"लोकप्रतिनिधी कुठलेही असतील त्यांनी चारित्र्य सांभाळणं आवश्यक असतं. राजकारणी मग तो महिला असो की पुरुष त्याने आपली प्रतिमा जपावी लागते. एक महिला म्हणून मी सांगू इच्छिते की महिलांवर कायम बोललं जातं की ही अशी आहे आणि तशी आहे. पुरुषांना चारित्र्य नसतं का? हा प्रश्न निर्माण होतो. लोकप्रतिनिधी म्हणून चार लोकांचं प्रतिनिधीत्व करत असतो तेव्हा आपण काय उदाहरण ठेवतो? "असा प्रश्न अयोध्या पौळ यांनी म्हटलं आहे.

* “भाजपानेच या क्लिप दिल्या आहेत की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ?”:➖ वैभव नाईक

एक बाजू अशी आहे की अशा प्रकारच्या क्लिप ज्या समोर आल्या आहेत. किरीट सोमय्या सातत्याने दुसऱ्यांवर आरोप करत आहेत. अनिल परब यांच्यावरही त्यांनी आरोप केले. अजित पवारांवर आरोप केले, हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले. त्यांच्यावरही अनेक आरोप केले. राष्ट्रवादीच्या अनेक लोकांवरही आरोप केले. राष्ट्रवादी सत्तेत येण्यासाठी डील झालं आहे का? भाजपानेच या क्लिप दिल्या आहेत की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्या आहेत? असे प्रश्न वैभव नाईक यांनी उपस्थित केले आहेत.

* “या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे”:➖ एकनाथ खडसे

"मी व्हिडीओ पाहिलेला नाही. मात्र हा अश्लील व्हिडीओ आहे असं कळतं आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे" असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या