🌟परभणी जिल्ह्यातील युवकांनो,मतदार यादीत नावनोंदणी करा - जिल्हाधिकारी आंचल गोयल


🌟मतदार जनजागृती रॅलीला हिरवा झेंडा शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद🌟


परभणी (दि.२२ जुलै २०२३): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाकडून १ जानेवारी २०२४ रोजी वयाची १८ वर्षे अर्हता पूर्ण करणाऱ्या सर्व युवक-युवतींनी मतदारयादीत आपली नावनोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आज येथे केले.

जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून आज शुक्रवारी सकाळी मतदार ‌यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानिमित्त प्रियदर्शिनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथून विशेष जनजागृती रँलीचे आयोजन करण्यात आले होते.  या रॅलीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आंचल गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी श्रीमती गोयल बोलत होत्या.

महानगर पालिका आयुक्त तृप्ती सांडभोर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संदीप घोन्सीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड, तहसीलदार अमित घाडगे, नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर, श्रीमती अनिता वडवळकर, क्रीडा अधिकारी शैलेश गौतम, जिल्हा यंत्रणेचे अधिकारी, केंद्रस्तरीय नोंदणी अधिकारी, विविध शाळेचे शिक्षक यावेळी उपस्थित होते. 

सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आजपासून पुढील (२१ ऑगस्टपर्यंत) महिनाभरात नव मतदारांची नावनोंदणी, दुरुस्ती, नाव वगळणे आणि मतदारसंघातील नाव बदलण्याची विशेष मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांनी विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे त्या म्हणाल्या.  

राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकारी परभणी यांच्या पत्रान्वये १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्यक्ष घरोघरी भेटी देऊन वरील कालावधीत पडताळणी करणार आहेत. मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यासाठी २२ ऑगस्टपासून या मोहिमेला सुरुवात होणार असून, हे काम २० सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. 

मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी मृत, कायमस्वरुपी स्थलांतर केलेल्या मतदारांची नावे वगळणे, तसेच १८ ते १९ वर्ष वयोगटातील नवमतदारांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी करून घ्यायची आहे. मतदार यादीमध्ये महिलांच्या नावनोंदणीचे प्रमाण वाढविणे,‍ दिव्यांग मतदारांना चिन्हांकित करण्यासाठी त्यांच्याकडून नमुना क्रमांक ८ चे अर्ज दिव्यांगांचे प्रमाणपत्र घेऊन भरून घेणे, तसेच मतदार यादीतील चुकीच्या नावांची दुरुस्ती करण्यासाठी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांनी मतदारांच्या घरी भेटी देत पडताळणी करावी, असेही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले.

यावेळी शहरातील मराठवाडा हायस्कूल, कस्तुरबा गांधी, गांधी विद्यालय, जिल्हा परिषद कन्या प्रशाला व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी -विद्यार्थिनी सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी हातात ‘कोण म्हणतं नावनोंदणी आहे किचकट, करून तर पाहा होते की पटापट’, ‘अठरावं सरलं मतदार यादीत नाव नोंदवलं,’ ‘मतदारयादीत नाव नोंदवून सुजाण नागरिक बना,’अशा आशयाचे फलक धरुन मतदारांचांची जनजागृती केली. ही रॅली जिल्हा क्रीडा संकुल येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप झाला. इथे अखिल समाजकार्य महाविद्यालयाच्या युवकांनी पथनाट्य सादर केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. आणि मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी उपस्थित केंद्रस्तरीय अधिकारी व विद्यार्थी यांना मतदार नावनोंदणी, मतदारांचे भारतीय लोकशाहीतील महत्त्व, त्यांच्या मतदानाचे लोकशाहीतील मूल्य याबाबत माहिती देत पुनरीक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी मतदानाविषयी मतदारांमध्ये जाणिवजागृती निर्माण करणे आणि मतदानाचे महत्त्व पटवून देण्याबाबत निवडणूक विभागाच्या पथकाने मार्गदर्शन केले तर उप जिल्हाधिकारी (निवडणूक) श्री. गायकवाड यांनी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत केंद्रस्तरीय अधिका-यांना सविस्तर माहिती दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या