🌟नांदेड-जालना समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी धावल्या खा.डॉ.फौजिया खान....!


🌟‘समृध्दी’च्या भुसंपादनात शेतकऱ्यांना योग्य मावेजा देण्याची महसुलमंत्री विखे पाटील यांच्याकडे केली मागणी🌟

परभणी :  समृध्दी महामार्ग नागपूर-मुंबई या रस्त्याला नांदेडवरून जोडणार्‍या रस्त्यासाठी होणार्‍या भुसंपादनामधील शेतकर्‍यांना योग्य तो मावेजा देण्यात यावा, अशी मागणी खासदार डॉ. फौजिया खान यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

           नागपूर-मुंबई हा समृध्दी महामार्ग औरंगाबादवरुन जात आहे. या समृध्दी मार्गास नांदेडपर्यंत जोडणार्‍या रस्त्यासाठी भुसंपादन करण्यासाठी कार्यवाही सुरु आहे. हा रस्ता अत्यंत महत्वाचा असून या रस्त्याचे काम विहीत वेळेत होणे अत्यावश्यक आहे. या रस्त्यामध्ये परभणी जिल्हयातील मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या जमिनी भुसंपादनामध्ये जाणार आहेत. या जमिनी संपादित होणार असल्यामुळे शेतकर्‍यांसमोर मोठ्या प्रमाणात त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण होणार असून त्यांना इतर ठिकाणी जमीन खरेदी करणे गरजेचे आहे. तसेच उदरनिर्वाहासाठी दुसरे साधन पाहणे फार गरजेचे आहे, असे या पत्रात नमूद केले असून सध्यस्थितीत २०१३ चा भुसंपादनाचा कायदा अंमलात आहे. हा कायदा तयार करण्यामागची भूमिका शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा पुरेसा व योग्य मोबदला मिळावा आणि त्यांचे चांगल्यारितीने पुनर्वसन व्हावे या उद्देशाने केलेला आहे, ही बाब निदर्शनास आणून दिली.

          सध्यस्थितीत समृध्दी महामार्गाला जोडणार्‍या नांदेड- औरंगाबाद रस्त्याच्या भूसंपादनामध्ये शेतकर्‍यांना किती मावेजा मिळणार आहे? याविषयी शेतकर्‍यांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. भुसंपादनाचा मावेजा कमी मिळाल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यांना पुरेसा मावेजा मिळणे गरजेचे आहे. याकरिता या शेतकर्‍यांशी चर्चा करुन, सभा घेऊन तसेच समुपदेशन करून या महामार्गासाठी जमीन संपादन करणे आवश्यक आहे आणि ते लोकहिताचे होईल, असे खा.खान यांनी म्हटले आहे. समृध्दी महामार्गास जोडणार्‍या नांदेडवरुन औरंगाबादकडे जाणार्‍या रस्त्याच्या भुसंपादनाचा मावेजा पुरेसा मिळावा, या दृष्टीकोनातून राज्य महसूल विभागाद्वारे शेतकर्‍यांची बैठक घेऊन त्यांचे समुपदेशन करून त्यांना किती मावेजा मिळणार आहे, त्याची सविस्तर माहिती  द्यावी. त्यांंच्या मनातील संंभ्रम दूर करावा आणि शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीचा योग्य मावेजा मिळावा या दृष्टीकोनातून महसूल विभागाद्वारे कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार खान यांनी या पत्राद्वारे केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या