🌟जालना-नांदेड समृध्दी महामार्गावरील प्रकल्पग्रस्तांच्या अपेक्षा उंचावल्या...!


🌟महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष राधेशाम मोपलवारांनी दिले मोबदल्या संदर्भात योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन🌟

परभणी (दि.१४ जुलै २०२३) : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष राधेशाम मोपलवार यांनी येत्या चार दिवसात समृध्दी महामार्गाकरीता संपादित केल्या जाणार्‍या जमीनीच्या मोबदल्या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांबरोबर चर्चा करीत निश्‍चित मार्ग काढू असे ठोस आश्‍वासन दिल्याने जालना ते नांदेड या समृध्दी महामार्गावरील प्रकल्पग्रस्तांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

             हिंदुर्‍हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गात जाणार्‍या जमीनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकर्‍यांच्या एका शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. परभणी, जालना व नांदेड या तीन जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांनी मुंबईस धाव घेवून उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली. त्यातून या महामार्गाकरीता संपादित केल्या जाणार्‍या जमीनीचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. दुधना, पूर्णा, गोदावरी या नद्यांच्या काठावरील तसेच पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिध्देश्‍वरच्या पाणलोट क्षेत्रातील या जमीनी पूर्णतः सुपीक व बागायती आहेत. परंतु, शासनाकडून संपादित जमीनीचा मोबदला अतिशय तुटपुंजा मिळतो आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हैराण आहेत. असे मत या शेतकर्‍यांनी व्यक्त केले.

              त्यावेळी उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ मोपलवार यांच्याशी संपर्क साधला. या शेतकर्‍यांना न्याय द्यावा, असे स्पष्ट केले. मोपलवार यांनी लगेचच या शेतकर्‍यांना रस्ते विकास महामंडळाच्या मुख्य कार्यालयात बोलावून त्यांचे म्हणणे ऐकले व येत्या चार दिवसात जिल्हाधिकार्‍यांबरोबर बैठक घेवून प्रश्‍न सोडवू, असे आश्‍वासन दिले.

             यावेळी गोविंदराव घाटोळ, प्रा. कुंडलिकराव जोगदंड, अशोकराव रणेर, कालिदास निर्वळ, दासराव हंबरडे यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही भेट घेतली. त्यातून या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या