🌟शिक्षित समाजच क्रांती करु शकतो,मातंग समाजाने जागृत आणि संघटीत व्हावे : चंद्रशेखर बानवकुळे यांचे प्रतिपादन....!


🌟परभणीत आयोजित मातंग समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बानवकुळे बोलत होते🌟

परभणी (दि.29 जुलै 2023) : शिक्षित समाजच क्रांती करु शकतो, असे नमूद करीत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विखुरलेल्या मातंग समाजाने आपल्या न्याय हक्काकरीता जागृत होवून संघटीत झालेच पाहिजे, शिक्षित झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

         वसमत रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीतील व्यंकटेश मंगल कार्यालयाच्या सभागृहात आज शनिवार दि.29 जुलै 2023 रोजी दुपारी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेद्वारे मातंग समाजाचे 11 वे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे अध्यक्षस्थानी होते. तर  प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, विक्रम पाटील, आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, माजी आमदार रामराव वडकुते, माजी आमदार गजाननराव घुगे, अ‍ॅड. शिवाजीराव जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, महानगर अध्यक्ष राजेश देशमुख,  विधानसभा प्रमुख आनंद भरोसे,  ज्येष्ठ नेते विजयराव वरपुडकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रमोद वाकोडकर, विठ्ठलराव रबदडे, अ‍ॅड. व्यंकटराव तांदळे, सुरेश भुमरे, बाळासाहेब जाधव, ज्ञानोबा मुंढे, समीर दुधगावकर, मोहन कुलकर्णी, संजय शेळके, मधुकर गव्हाणे, रामकिशन रौंदळे, अनुप शिरडकर, गणेश देशमुख, संजय कुलकर्णी, दिनेश नरवाडकर आदी उपस्थित होते. यावेळी  संयोजक तथा महामंत्री राधाजी शेळके, शिवाजी शेळके यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

          यावेळी बावनकुळे यांनी आपल्या भाषणातून मातंग समाजाचे स्वातंत्र्यलढ्यातही मोठे योगदान राहिलेले असून मागासवर्गियांमध्ये दुसर्‍या क्रमांकावर असलेला हा समाज विखुरलेला आहे. या समाजास अजूनही न्याय हक्कासाठी झगडावे लागते. त्यामुळे समाजाला शिक्षित, जागृत व संघटित करा, कारण शिक्षित समाजच क्रांती करू शकतो, असे म्हटले. भाजप मातंग समाजाच्या विकासासाठी कटिबध्द असून सर्व प्रश्‍न सोडवू. महाराष्ट्रातील नवे सरकार धडाडीने काम करीत आहे, असेही ते म्हणाले.

           परभणीत क्रांतीवीर लहुजी साळवे यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात झालेल्या मागणीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, तुम्ही परभणी मनपावर महायुतीची सत्ता आणा, त्यानंतर पहिल्याच महिन्यात ही मागणी पूर्ण करू.  प्रास्ताविकात राधाजी शेळके यांनी समाजाच्या विविध प्रश्‍नांकडे नेत्यांचे लक्ष वेधले. तसेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे 15 प्रमुख मागण्या सादर केल्या. या अधिवेशनात मातंग व बहुजन समाजाच्या अनेक प्रश्‍नांवर विचारमंथन करण्यात आले. अधिवेशनाला महिला व पुरूष समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या