🌟राज्यपालांद्वारे अध्यादेश लागू : अपात्र ग्रामपंचायत सदस्य पुन्हा पात्र...!


🌟जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरण : त्या 200 ग्रामपंचायत सदस्यांना सदस्यपदावर पात्र राहण्याचा मार्ग मोकळा🌟 

परभणी (दि.11 जुलै 2023) : ग्रामपंचायतीच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांद्वारे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढविण्यासंदर्भात राज्यपालांनी 10 जूलै रोजी काढलेल्या नव्या अध्यादेशाने परभणी जिल्ह्यात अपात्र ठरलेल्या त्या 200 ग्रामपंचायत सदस्यांना सदस्यपदावर पात्र राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

            परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या परंतु, वारंवार दिलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या 200 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी सौ. आंचल गोयल यांनी 7 जूलै 2023 रोजी अपात्र घोषित केले होते. त्यामुळे या सदस्यांचे सदस्यत्वच रद्द झाले. परभणी प्रमाणे अन्य जिल्ह्यातसुध्दा ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्यांवर गंडांतर कोसळल्याने ग्रामविकास विभागाने सार्वत्रिक किंवा पोट निवडणूकांमधून राखीव जागेवरुन निवडून आलेल्या व्यक्तींची वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढविण्यासंदर्भात हालचाली सुरु केल्या होत्या. विशेषतः या संदर्भात अध्यादेश निघावा म्हणून सरकारद्वारे प्रयत्न सुरु होते. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे अधिवेशन चालू नाहीत. उपरोक्त प्रयोजनासाठी कायदा करण्याकरीता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कारवाई करणे, आवश्यक व्हावे, अशी परिस्थिती अस्तित्वात आल्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी या संबंधिचा अध्यादेश लागू केला. दरम्यान, या अध्यादेशामुळे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील अपात्र सदस्यांना पुन्हा सदस्य पदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या