🌟जिंतूर पोलिस स्थानकात दाखल 'पॉक्सो' गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता....!


🌟आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता🌟 

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.२६ जुन २०२३) - अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचे फोटो इंस्टाग्राम वर व्हायरल करण्या संदर्भातील दाखल गुन्ह्यातील आरोपी गोपाल मधुकर जाधव याची परभणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दि.२५ सप्टेंबर २०२० रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, आरोपी गोपाल मधुकर जाधव याने तिचा विनयभंग करून विनयभंग करतानाचे काढलेले फोटो तिच्या वडिलांच्या व्हाट्सॲप वर पाठवले तसेच इंस्टाग्राम वर व्हायरल केले आणि धमकी दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गोपाल मधुकर जाधव याच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (क),३५४ (ड), लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम 8, 12 आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७,६७ (अ),६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास करून जिंतूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध परभणी येथील विशेष न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

तब्बल अडीच वर्षे चाललेल्या या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अनेक साक्षीदार तपासण्यात आले व आरोपीतर्फे त्यांची उलटतपासणी ॲड. सुनिल बुधवंत यांनी घेतली. त्यांनी, या प्रकरणात एफ.आय. आर. दाखल करण्यात झालेला उशीर,पीडित मुलीच्या वडिलांची साक्ष न होणे, तथाकथितरित्या पीडितेचे फोटो असणारा मोबाईल न्यायालयासमोर सादर न करू शकणे, तसेच संबंधित व्हाट्सॲप व इंस्टाग्राम अकाउंट ची माहिती न्यायालयासमोर न येणे इत्यादी बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.

सर्व साक्षी पुरावे तपासल्यानंतर सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील यांनी अंतिम युक्तिवाद केला तर आरोपीतर्फे ॲड. सुनिल बुधवंत यांनी, फिर्यादी व अभियोग पक्षाच्या साक्षीदारांच्या साक्षीने सदरचा गुन्हा सिद्ध होत नसल्यामुळे तसेच फिर्यादी मुलीला आरोपी सोबत लग्न करावयाचे होते परंतु आरोपीने तिला प्रतिसाद न दिल्यामुळे आरोपीवर दबाव टाकण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे आरोपीस निर्दोष मुक्त करण्याबाबतचा अंतिम युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर तसेच न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्यांच्या व उलटतपासणीच्या निरीक्षणांती, परभणी येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला एम. नंदेश्वर यांनी गुरुवार दि.२२ जून २०२३ रोजी आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या