🌟परिसर स्वच्छतेतून हिवताळाला आळा घाला - जिल्हा हिवताप अधिकारी


🌟हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती🌟        

परभणी (दि.८ जुन २०२३) : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जून हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून पाळला जातो. हा महिना मानवी आरोग्याच्या दृष्टिने अत्यंत काळजी घेण्याचा असून, या महिन्यात हिवताप व इतर किटकजन्य आजाराविषयी (डेंग्यू, जे.ई., चिकनगुनिया, चंडीपुरा व हत्तीरोग इत्यादी) जनतेमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यांच्यामार्फत प्रतिबंधात्मक (प्रतिरोध) उपाययोजनाची अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी सहभागी होत परिसर स्वच्छ ठेवून हिवतापाला आळा घालावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. व्ही. आर. पाटील यांनी केले आहे. 

            दरवर्षी विविध जाजागृतीपर उपक्रमांद्वारे हिवताप प्रतिरोध महिना पारेषण काळापूर्वी म्हणजे जून महिन्यात साजरा करण्यात येतो. या मोहिमेत गाव तसेच शहर पातळीवर हिवतापाची लक्षणे, उपचार व हिवताप प्रतिरोधाच्या विविध उपाययोजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविणे आवश्यक असून, डास उत्पत्ती प्रतिबंध उपाययोजनांमध्ये लोकसहभाग वाढविणे, हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. 

🩺 हिवतापाची प्रमुख लक्षणे :-

     ॲनाफिलीस डासाच्या मादीमुळे प्रसारित होणारा व प्लाझमोडियम या परोपजीवी जंतूमुळे हिवताप येतो. हा हिवतापाचा काळ १० ते १२ दिवसाचा असतो. यामध्ये प्लाझमोडियम वायवॅक्स, प्लाझमोडियम फाल्सीपेरम, प्लाझमोडियम मलेरी आणि प्लाझमोडियम ओव्हेल हे हिवतापाच्या जंतूचे प्रकार आहेत. यापैकी आपल्याकडे दोन प्रकारचे जंतू आढळतात. प्लाझमोडियम फॅल्सीपॅरम हा जंतूचा प्रकार अत्यंत घातक व जीवघेणा आहे. थंडी ताप येणे, हा ताप सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो. नंतर घाम येऊन अंग गार पडते. ताप आल्यानंतर डोके दुखते. बऱ्याच वेळा उलट्याही होतात ही प्रामुख्याने हिवतापाची प्रमुख लक्षणे आहेत.

🦟 ॲनाफिलिस डासाची माहिती :- 

हिवतापाचा प्रसार हा ॲनाफिलिस डासाच्या मादीपासून होतो. हे डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतात. डासाच्या जीवनचक्राच्या अंडी, अळी व कोष या तीन पाण्यात तर त्यानंतर प्रौढ अवस्था ही हवेमध्ये पूर्ण होते. अंडीपासून ते पूर्ण डास तयार होण्यासाठी त्याला ८ ते १० दिवस लागतात. दर तीन दिवसांनी ॲनाफिलिस मादी १५० ते २०० अंडी घालते. प्रत्येक वेळी अंडी घातल्यानंतर मादी प्राणी व माणसांचे रक्त शोषते. हिवताप झालेल्या रुग्णाचे निदान करण्यासाठी रक्तनमुना घेणे व प्रयोगशाळेत तपासणी करणे हा एकमेव सुलभ उपाय आहे.

🔥प्रतिबंधात्मक उपाययोजना :-

कोरडा दिवस पाळणे, डासाचे जीवनचक्र आठ ते दहा दिवसाचे असल्यामुळे म्हणजे पाण्यात अंडी घातल्यापासून आठ दिवसात डास तयार होऊन हवेत उडतात. त्यामुळे गाव, प्रभागांमध्ये कोरडा दिवस पाळावा. सर्व भांडी घासून पुसून स्वच्छ करून ती दोन तास ऊन्हांमध्ये वाळवून मगच त्यामध्ये पाणी भरावे. पाणी भरल्यानंतर ती भांडी झाकून ठेवावीत. रिकामे न करता येणाऱ्या पाणीसाठ्यामध्ये डास अळी मारण्यासाठी अळीनाशक (टेमीफॉस)चा वापर करावा. तसेच मोठ्या पाणी साठ्यामध्ये गप्पी मासे सोडणे, या हिवतापावर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.

💥 किटकशास्त्रीय सर्वेक्षणांतर्गत करावयाच्या उपाययोजना :-

            किटकशास्त्रीय निर्देशांक एच.आय. सी. आय. बी. आय. हे धोक्याच्या पातळीवर आढळून आल्यास त्या संपूर्ण कार्यक्षेत्रात कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. ज्या कंटेनरमध्ये अळ्या आढळून आलेल्या आहेत, ते कंटेनर रिकामे करून व काहींमध्ये टेमीफॉस या अळीनाशकाचा वापर करण्यात येत आहे. अळ्या असलेले पाणी गटारीत ओतू नये तर जमिनीवर ओतावे, असे ग्रामस्थांना सांगण्यात येते. गाव, परिसरातील टायर, फुटके डब्बे, रिकामे नारळ असे सर्व निरोपयोगी वस्तूची विल्हेवाट लावण्याबाबत सूचना द्याव्यात. तुंबलेली गटारे, साचलेले पाणी वाहते करावे. जवळपास असलेले खड्डे बुजावेत व इतर ठिकाणी आढळून येणाऱ्या डासोत्पत्ती स्थानामध्ये गप्पी माशांचा वापर करावा, अशा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या असून, उद्रेकाचे स्वरुप व व्याप्ती मोठ्या प्रमाणावर आढळून आल्यास तेथे धूर फवारणी करावी. 

            सध्या हिवताप प्रतिरोध महिन्यात जनजागृती करण्याच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य विभागाकडून  हिवताप (मलेरिया) हा आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. एका आठवड्यापेक्षा जास्त काळ पाणी साठवू नये. आठवड्यातून किमान दोन वेळेस पाणीसाठे रिकामे करून घासून-पुसून नंतरच पाणी भरावे. टायर्स व निरुपयोगी, भंगार सामान घराबाहेर तसेच छतावर ठेवू नये. त्यामध्ये पावसाचे पाणी साचून डास उत्पत्ती होते. त्यामुळे या प्रकारच्या सामानाची वेळीच विल्हेवाट लावावी. कुलरमधील पाणी आठ दिवसात बदलावे. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. वैयक्तिक संरक्षणासाठी डासांना पळवून लावणारी साधने वापरावीत. नाले, गटारे वाहती ठेवावीत. जास्त काळ पाणी साठून राहत असल्यास त्यामध्ये जळालेले. तेल, वंगण, केरोसीन टाकावे. पाण्याची डबकी, तळे या ठिकाणी डास अळ्यांना खाणाऱ्या डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावेत. तापाचा रुग्ण आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांकडे न्यावे. प्रत्येक ग्रामपंचायतीने धूरफवारणी यंत्र व बेट खरेदी करावेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णकल्याण समितीमधून धूरफवारणी यंत्र व ५ लिटर अॅबेट खरेदी करावे. याप्रमाणे सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे केल्यास किटकजन्य रोग हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्याचा प्रसार रोखण्यास निश्चितच मदत होईल, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. व्ही. आर. पाटील यांनी आवाहन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या