🌟परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम....!


🌟या कार्यक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्रमणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार🌟

परभणी (दि.०२ जुन २०२३) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी व केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नांदेड येथील केंद्रीय संचार  ब्यूरो यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरातील कृषी महाविद्यालय येथे सोमवार दि.०५ जुन २०२३ रोजी सकाळी १०-०० वाजता जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, वाढते प्रदूषण, प्लास्टीकचा अनियंत्रित वापर, स्वच्छतेचा अभाव, जंगलांचा –हास, वन्य जीवांची शिकार,नदी प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली अशा अनेक कारणांमुळे पर्यावरणाला मोठी हानी पोहचत आहे. त्यामुळे तापमानात वाढ, अती किंवा अल्पवृष्टी होवून दुष्काळ आणि पाणीटंचाई, विविध आजार, आदी समस्यांचा सामना करावा लागत आहे. या सर्व मानवनिर्मित आपत्तीपासून पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण  करण्यासाठी जगभरात ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन केले जाते.

 नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी कृषी विद्यापीठात तृणधान्याचा आहारात उपयोग आणि मिशन लाईफ या विषयांवर पोस्टर, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये  कृषी विद्यापीठातील वेगवेगळ्या शाखांचे विद्यार्थी सहभागी होतील. यावेळी वृक्षलागवड, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध मान्यवरांचे मार्गदर्शन आणि विजेत्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र व पारितोषिक  देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून शिक्षण तथा कृषी संचालक डॉ. धर्मराज गोखले, उपवनरक्षक केशव वाबळे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इस्माईल, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये व सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या