🌟मराठवाड्यातील गोदाकाठच्या जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात सतर्कता गरजेची....!


🌟विभागीय आयुक्तांचे मत : मान्सून उपाययोजना : पूर परिस्थितीचा आढावा🌟

परभणी (दि.१५ मे २०२३) :  मराठवाड्यातील छ.संभाजी नगर (औ.बाद),जालना, परभणीसह नांदेड या गोदावरी नदीकाठावर असलेल्या जिल्ह्यांनी पावसाळ्यात सर्तकता राखणे गरजेचे आहे. या जिल्ह्यांनी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाऊसस्थितीचा दैनंदिन आढावा घ्यावा. जिल्हा प्रशासनात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही विभागीय महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले.

           विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी आज सोमवार १५ मे रोजी मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मनीष कलवानिया, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी वसंत गालफाडे, महवितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

           आपत्ती व्यवस्थापनात संपर्कसातत्य अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगून विभागीय आयुक्त केंद्रेकर म्हणाले, आपत्तीपूर्व नियोजन करताना यंत्रणा अद्ययावत असावी. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा. माहिती देणारी साखळी तत्पर ठेवतानाच जिल्हा नियंत्रण कक्षाने सर्वदूर संपर्कसातत्य ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही संदेशाला दुर्लक्षित करु नका, आपला दूरध्वनी बंद राहणार नाही याची काळजी घ्यावी. गावातील अंगणवाडी सेविका ते गावात कार्यरत असलेल्या यंत्रणेला विश्‍वासात घेत गावपातळीवर सातत्याने संपर्कात रहा, अशा सूचनाही केंद्रेकर यांनी यावेळी केल्या. गोदाकाठच्या जिल्ह्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे सांगून केंद्रेकर म्हणाले, औरंगाबाद, जालना, परभणी व नांदेड या जिल्ह्यांनी गोदावरी नदीबाबत सर्तकता राखणे गरजेचे आहे. या जिल्ह्यांनी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाऊसस्थितीचा दैनंदिन आढावा घ्यावा. जिल्हा प्रशासनात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन केले.

        आपत्ती कालावधीत काम करताना तलाव, रस्ते, घरे व वीज यंत्रणेबाबत सातत्याने आढावा घ्यावा. वेळीच दक्षता घेतली तर आपत्तीच येणार नाही, असे काम करा. पावसाळ्यात साथरोग वेगाने पसरतात.  साथरोगाची संभाव्यता लक्षात घेता औषधांचा मुबलक प्रमाणात साठा ठेवावा, निवारा केंद्रे, अन्नपुरवठा व बोटी याबाबतही दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. महावितरण विभागाने ग्रामीण व शहरी भागात आपातकालीन परिस्थितीत विज पुरवठा सुरळीत राहील,यासाठी नियोजन करावे. नदी लगतच्या तसेच प्रकल्पाच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील नागरी वस्तींना धोका निर्माण झाल्यास आधीच त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बचाव पथके तयार ठेवावीत. तसेच अधिक पर्जन्यमान अंदाज घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने अगोदरच पूररेषेबाहेर निवासाची व्यवस्था करावी. जलसंपदा विभागाने प्रकल्पातील पाणीपातळी व पाण्याचा विसर्ग याबाबत दैनंदिन अहवाल प्रशासनाला कळवावा, अशा सूचनाही केंद्रेकर यांनी दिल्या. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी जलसंपदा विभागाच्या वतीन मान्सूनपूर्व सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या