🌟मान्सून पूर्वतयारीची कामे पंधरा दिवसात पूर्ण करा - जिल्हाधिकारी आंचल गोयल


🌟जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सून २०२३ पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली🌟

परभणी (दि.१२ मे २०२३) : जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील गावांबाबतचा पूर नियंत्रणाबाबत आपत्ती निवारण आराखडा आठवडाभरात तयार करावा. तसेच सर्व संबंधित यंत्रणेने मान्सून पूर्वतयारीची कामे येत्या १५ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच सर्व यंत्रणेने आपत्ती काळात सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज येथे दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सून २०२३ पूर्वतयारी आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्याप्रसंगी श्रीमती गोयल बोलत होत्या. 

प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर, माधव बोथीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जयश्री यादव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अश्विनी स्वामी, गृह शाखेचे पोलीस उपअधीक्षक प्रकाश राठोड, यांच्यासह मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार व संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. 

तहसील पातळीवरील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून तो प्राधिकरणाकडे सादर करायचा असल्यामुळे त्याचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. जिल्हा स्तरावरील समितीमध्ये नोडल अधिकारी नियुक्त करून त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्यावी. नैसर्गिक आपत्तीप्रसंगी नोडल अधिका-यांनी पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. नोडल समितीमध्ये नावे आणिसंपर्क क्रमांक देताना ती व्यक्ती तितकीच जबाबदारीने वागणारी असावी, असे सांगून तालुक्यातील पट्टीच्या पोहता येणा-या नागरिकांची संपर्क यादी तयार करून ती जिल्हास्तरावरीय समितीकडे शेअर करावी. अधिका-यांनी नोडल अधिकाऱ्यांसोबत नदीकाठावरील गावातील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी इतर प्रतिष्ठित नागरिक, सर्पमित्र यांचे गावनिहाय व्हॉट्स अप ग्रूप तयार करावेत. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ब्लिचींग पावडर, रक्तगट, दाते ‌यांची माहिती द्यावी, मोबाईल व्हँनची माहिती द्यावी.  तसेच अतिवृष्टीमुळे साथीचे रोग पसरणार नाहीत, यासाठी मेडीकल कीट, ब्लिचिंग पावडरचा साठा तयार ठेवावा. तसेच नियंत्रण स्थापन करण्याच्या सूचना श्रीमती गोयल यांनी दिल्या. 

नगरपालिका व महानगरपालिकांनी त्यांच्या क्षेत्रातील नाल्या तात्काळ स्वच्छ करून घ्याव्यात. पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यास त्याची तात्काळ माहिती समितीला द्यावी. जलसंपदा, जलसंधारण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभागाने पाझर ‌तलावाची सद्यस्थितीची माहिती द्यावी. छोटे धरण तसेच छोट्या पुलाची सद्यस्थितील माहिती व्यवस्थापन कक्षाला द्यावी. वाहनांची गरज पडल्यास कंत्राटदारांची यादी द्यावी. कुशल व अकुशल कामगारांची यादी देत त्याचा आराखडा तयार करावा. महामार्गाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी पाणी साचत असल्यास त्याची माहिती द्यावी. भविष्यात नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास ऐनवेळी नागरिकांना हलविण्यासाठी परिवहन अधिकाऱ्यांनी वाहने सुस्थितीत ठेवावीत तर वीजपुरवठा सुरळीत राहील याची विज वितरण अधिका-यांनी तयारी ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी दिले. 

जलाशयातून विसर्ग सोडण्यापूर्वी धरणाखालील नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा द्यावा. जिल्ह्यात वीज कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी दामिनी अँपचा गावपातळीवर वापर वाढावा, यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना केल्या.जिल्हा परिषद, मनपा, नपा यांनी जुन्या घरांची तपासणी करून धोकादायक घरातील सदस्यांना बाहेर सुरक्षित स्थळी पोहचण्यासाठी नोटीस द्यावी. तसेच धोकादायक इमारती पाडून टाकाव्यात, पूरबाधीत गावांना पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करावी. आपत्तीकाळात  संपर्क यंत्रणा सुरळीत राहील,याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. 

तसेच यावर्षी पावसाळ्यावर अल निनोचा प्रभाव पडणार असून, संबंधित यंत्रणांनी पाणीटंचाई आराखडा तयार करावा. सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण करून घ्यावे. जलस्त्रोत अधिगृहीत करावयाचे असल्यास त्याची कार्यवाही आतापासूनच सुरू करावी. सार्वजनिक विहिरींचे अर्धवट असलेले काम पूर्ण करून घ्यावे. तसेच पाणीस्त्रोत निश्चित करून ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. 

जिल्ह्यात काल घडलेली घटना ही अत्यंत वाईट असून, या दुर्घटनेच्या अनुषंगाने सेफ्टी टँकच्या दृष्टिकोणातून सर्व तयारी करावी. जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हाताने मैला साफ करणा-यांचा सर्वे करून त्याची यादी तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तत्पूर्वी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे सादरीकरण केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या