🌟शेतकऱ्यांसाठी वीज जोडणी अभियान युद्धपातळीवर राबवा - पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत


🌟जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक🌟 


परभणी (दि.२६ मे २०२३) : राज्यात आगामी दिवसांत अल निनोचा पर्जन्यमानावर प्रभाव पडण्याची शक्यता असून, महावितरण विभागाने शेतीसाठी तात्काळ रोहित्र उपलब्ध करून द्यावेत, ते जळाले असल्यास तात्काळ बदलण्याची प्रक्रिया करावी आणि त्यासाठी लागणारे आगाऊ ऑईल उपलब्ध करून घ्यावे. ही कार्यवाही विनाविलंब करताना वीज जोडणी प्रक्रिया युद्धपातळीवर राबविण्याचे आदेश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री तथा पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिले.  


   जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार विप्लव बाजोरिया, सुरेश वरपुडकर, डॉ. राहुल पाटील, श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी श्रीमती रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

     जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, तो मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. शेतक-यांना अल निनोच्या प्रभावामुळे पिकांना पाणी पुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन चर्चा करावी  व समस्या सोडवाव्यात. यासाठी महावितरणने नाविन्यपूर्ण अभियान युद्धपातळीवर राबवून त्याचा आठ दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. 

तसेच राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान -२ ची प्रभावी अंमलबजावणी करावी. मराठवाड्यासाठी पथदर्शी प्रकल्प असणाऱ्या वॉटर ग्रीड योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन करा. सर्वसामान्य जनतेची आर्थिक स्थिती सुधारली तरच राज्याची अर्थव्यवस्था सुधारणार असल्याचे डॉ. सावंत यावेळी म्हणाले. 

            जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच त्यांच्या विकासासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये बोगस बि-बियाणे, खतपुरवठा किटकनाशकांची विक्री करताना आढळून आल्यास कृषि केंद्र संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. यासोबतच सिबील स्कोअर तपासून पीककर्जासाठी अडवणूक करणाऱ्या बँकावरही गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. 

कृषि‍ विभागाने फळबाग लागवड, शेततळे, अस्तरीकरण, सौर कृषिपंप आदी योजनांबाबत लोकांमध्ये जनजागृती करावी. राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींवर कृषि अधिकारी, सहायक आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचे संपर्क क्रमांक आणि योजना, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची माहिती देण्याच्या सूचना केल्या. तसेच यावेळी पालम तालुक्यातीलकाही गावांमध्ये रस्त्यावर मुरुम टाकण्यास सरपंचांना अडकाठी आणाऱ्या उपअभियंत्याची विभागीय चौकशी करून आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. 

             सन २०२२-२३ करिता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक उपयोजने अंतर्गत २५१ कोटी, आदिवासी उपयोजने अंतर्गत रु. २ कोटी २३ लाख ६३ हजार आणि अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत ६० कोटी असा तिन्ही योजनांसाठी एकूण ३१३ कोटी २३ लाख ६३ हजार एवढा निधी शासनाने बीडीएस प्रणालीवर उपलब्ध करुन दिला होता. या  निधीपैकी मार्च-२०२३ अखेरपर्यंत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २५० कोटी ९९ लाख ९९ हजार, आदिवासी उपयोजने अंतर्गत २ कोटी २३ लाख, आणि अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत. ६० लाख असा तिन्ही योजनांचा एकूण ३१३ कोटी २३ लाख 29 हजार असा १०० टक्के निधी खर्च झाला असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

तसेच सन २०२३-२४ करिता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक उपयोजने अंतर्गत २९० कोटी, आदिवासी उपयोजने अंतर्गत २ कोटी २३ लाख ६३ हजार आणि अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत ६२ कोटी याप्रमाणे एकूण रुपये ३५४  कोटी २३ लाख ६३ हजार एवढा नियतव्यय अर्थसंकल्पीत असून त्यापैकी आजपर्यंत २९ कोटी २२ लाख ३६ हजार रुपये इतका निधी शासनाने बीडीएस प्रणालीवर उपलब्ध करुन दिला आहे.  

यावेळी १६ जानेवारी, २०२३ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या इतिवृत्तानिहाय केलेल्या कार्यवाहीच्या अनुपालनास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ माहे मार्च-२०२३ अखेर खर्चास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ माहे मे २०२३ अखेर खर्चाचा आढावा यासह इतर विषयावर चर्चा व निर्णय घेण्यात आले.

 पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते कॉफीटेबल बुक, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी परभणीच्या ‘आरोग्य चित्रगाथा’चे विमोचन, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2019, हा ग्रामपंचायत लोहगावला प्रदान करण्यात आला. बालविवाह मुक्त परभणी अभियानाची चित्रफित दाखविण्यात आली.

            यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी प्रास्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.  तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या