🌟संत रोहिदास‌ चर्मोद्योग विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्या - जिल्हा व्यवस्थापक


🌟राज्य शासनाची ‘शासकीय योजनांची जत्रा’ उपक्रम🌟

परभणी (दि.०४ मे २०२३) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गंत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडून यंदा राज्य शासनाच्या अनुदान योजना, बीजभांडवल तर केंद्र शासनाची एन.एस.एफ.डी.सी. योजना राबविण्यात येत आहे. राज्य शासनाच्या 'शासकीय योजनांची जत्रा' या उपक्रमांतर्गंत महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती एस. व्ही. पराते यांनी केले आहे.

राज्यातील चर्मकार नागरिकांचे जीवनमान उंचावणे, समाजात मानाचे स्थान मिळविण्याच्या हेतूने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या अनुदान योजना व बीजभांडवल योजनेसाठी इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी अटी शर्तीची पूर्तता करून अर्ज कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. 

अर्जदाराने कर्ज मागणी घटक व बीज स्वहस्ताक्षरात, टंकलिखीत अथवा महामंडळाच्या विहीत नमुन्यातील झेरॉक्स प्रतीत अर्ज करावेत. महामंडळ राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती कार्यालयाच्या नोटिस बोर्डावर लावण्यात आली असून, महामंडळाच्या कुठल्याही शासकीय योजनेचा पती अथवा पत्नी यांनी लाभ घेतलेला असल्यास किंवा अर्जदार हा कुठलाही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार असल्यास कर्ज प्रस्ताव अपात्र, रद्द करण्यात येईल. तसेच अर्जदाराचे विशेष घटक व बीज भांडवल योजनेंतर्गतचे यापूर्वीचे जुने कर्जप्रस्ताव रद्द, बाद करण्यात येतील.

अर्जदाराने नमूद केलेल्या कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात व्यक्तीशः अर्ज दाखल करणे अनिवार्य असून कर्ज प्रस्ताव मध्यस्थामार्फत स्विकारले जाणार नाही. अर्जदारांकडून सर्व परिपूर्ण कागदपत्र असलेले कर्ज प्रस्ताव स्विकारले जातील. अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांवर अर्जदाराची स्वाक्षरी आवश्यक असून त्याने दाखल केलेली कागदपत्रे खोटी आढळून आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. कामामध्ये मध्यस्थ हस्तक्षेप करीत असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याच्या नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.

कर्ज प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी निवड समितीच्या बैठकीमध्ये मान्यता घेऊन नंतरच कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी बँकेस, महामंडळाच्या प्रधान कार्यालयास पाठविण्यात येतील. कर्जप्रस्ताव बँकेस पाठविताना एका उद्दिष्टास दोन पट या पद्धतीने कर्ज प्रस्ताव ज्येष्ठतेनुसार बँकेकडे शिफारस करण्यात येतील. कर्जप्रस्तावासोबत जातीचा दाखला, चालू वर्षांचा उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड किंवा रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, कोटेशन (जीएसटीसह), आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल, वाहनाकरिता परवाना, बॅच बिल्ला, जागेचा पुरावा, लाईट बील, टॅक्स पावती, आणि व्यवसायाचे ना हरकत प्रमाणपत्र आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक असल्याचे श्रीमती पराते यांनी सांगितले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या