🌟परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडून आरोग्य सुविधांचा आढावा...!


 🌟वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा स्त्री रुग्णालयाची पाहणी : सामान्य रुग्णालयातील २० खाटांच्या अतिदक्षता विभागाचे उद्घाटन🌟


परभणी (दि.०१ एप्रिल) :- जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा नजिकच्या रुग्णालयात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग प्रयत्नरत असून, जिल्हा स्त्री रुग्णालय लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज जिल्हा स्त्री रुग्णालयाची महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर पाहणी केली अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार गणेश चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कालिदास चौधरी, अपर  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जयश्री यादव आदी उपस्थित होते. 


जिल्हा स्त्री रुग्णालयाचे काम अधिक गतीने आणि दर्जात्मक करण्याची काळजी घ्यावी. जिल्ह्यातील महिलांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत. तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे स्त्री रुग्णालयातील सुविधांबाबत कोणतीही कमतरता राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आरोग्य प्रशासन आणि कंत्राटदारांना दिल्या. रुग्णालय बांधकाम उच्च दर्जाचे होईल, याकडे लक्ष द्यावे. विद्युत उपकरणे, स्वच्छता, उद्वाहन यंत्रणा, सुरक्षा भिंतीचे बांधकाम दर्जात्मक व्हावे, वाहन पार्कींग व्यवस्थेचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. इतर काही दुरुस्ती, अपूर्ण राहिलेले किरकोळ बांधकाम पूर्ण करून घेण्याचे आदेशही त्यांनी दिले. 


जिल्ह्यातील महिला भगिनींना आरोग्याच्या उत्तमोत्तम सेवा पुरविण्यासाठी सर्वजण प्रयत्न करूयात. स्वच्छ, सुंदर आणि प्रशस्त वास्तू जिल्हावासीयांच्या सेवेत लवकरच उपलब्ध  होणार आहे. या वास्तूची स्वच्छता राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय स्त्री रुग्णालयासाठी आवश्यक बाबींच्या पूर्ततेसाठी वेळ मिळाला आहे. स्त्री रुग्णालयाच्या उद्घाटनापूर्वी आवश्यक बाबींसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करता येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच इमारतीच्या वरच्या भागात येथील आवश्यक वस्तू ठेवण्यासाठी शेड बनवण्याच्या सूचना दिल्या.  

 जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी प्रथम वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन इमारत परिसराची पाहणी केली. इमारतीची व्यावसायिक स्वच्छता करणाऱ्यांकडून तात्काळ स्वच्छता करून घेण्याच्या सूचना करत ही प्रक्रिया अधिक गतीने आणि योग्य समन्वयातून पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशा २० खाटांच्या अतिदक्षता विभागाचे उद्घाटन केले.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या