🌟राज्यातील कृषी केंद्रांची भरारी पथकांनी तपासणी करावी - पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत


🌟जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक पीककर्ज देताना शेतकऱ्यांची अडवणूक करू नका🌟 

परभणी (दि.११ मे २०२३) : खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोगस निविष्ठा विक्री करणाऱ्या कृषि केंद्रांवर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात कृषि विभागाच्या भरारी पथकांनी आकस्मिक तपासणी करावी. बोगस बि-बियाणे, खते, किटकनाशके विक्रेत्यांवर कडक कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज येथे दिलेत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम सन २०२३ जिल्हास्तरीय आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्यसंवादप्रणालीव्दारे घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री डॉ. सावंत यांनी आदेश‍ दिले.   

या बैठकीला दूरदृष्यसंवादप्रणालीव्दारे खासदार फौजिया खान, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर तर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, आत्माचे प्रकल्प संचालक डी.एस.चव्हाण, उपविभागीय कृषि अधिकारी आर.बी.हरणे यांच्यासह जिल्हा यंत्रणेचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे बोगस बियाणे विक्री करणे, शेतकऱ्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त निविष्ठा खरेदी करण्यास भाग पाडतात. कृषि केंद्रांवर असलेला बि-बियाणे, खतांचा साठा, झालेली विक्री आणि शिल्लक याबाबतचा मोठा फलक दर्शनीय भागात लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व कृषि विभागाने द्याव्यात. असे न करणाऱ्या कृषि केंद्र संचालकांवर प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता त्यांच्याकडील बियाण्यांचा साठा आणि गोदामे प्रत्यक्षात सील करून तसा त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. सावंत यांनी संबंधित यंत्रणेला दिले.   

यंदा राज्यातील पर्जन्यमानावर अल-निनोचा प्रभाव राहणार असून, जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी हवामान केंद्रांशी समन्वय ठेवत कृषि विभागाला वेळोवेळी मार्गदर्शन करावे. त्यासाठी वेळोवेळी आढावा बैठक घ्यावी. सोबतच कृषि विभागाने खरीप पेरणीसंदर्भात पर्जन्यमानासह उत्कृष्ट बियाणे, त्याची उगवणक्षमता, पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. त्यासाठी कृषि सहायकांपासून प्रगतीशील शेतकऱ्याचे विविध गट बनविण्यात यावेत. त्यामध्ये लोकप्रतिनिधीनाही सहभागी करून घेण्याच्या सूचना डॉ. सावंत यांनी यावेळी दिल्या. 

जिल्ह्यात कापूस, तूर, सोयाबीन आदी प्रमुख पिकांसह मूग, उडदाखालील क्षेत्रांचाही त्यांनी आढावा घेतला. प्रधानमंत्री पीक विमा योजना, फळबाग लागवड योजना, रेशीम लागवड, वीज जोडणी, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना, शेततळे, महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि नरेगाच्या माध्यमातून होणाऱ्या कामांचा आढावा यावेळी पालकमंत्री डॉ. सावंत यांनी घेतला जिल्ह्यात शेतकऱ्यांना वीजजोडणी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असून, शेतकऱ्यांना विनाविलंब जोडणी द्यावी. वीजजोडणी समाधानकारक नसल्यामुळे ३१ मे २०२३ पर्यंत त्याचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेशही यावेळी त्यांनी दिले. 

जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी कृषि विभागाने विशेष लक्ष घालून, या  योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घ्या. त्यासाठी कृषि सहायकांना विशिष्ट लक्ष्यांक द्यावा. शाश्वत सिंचनाच्या माध्यमातून शेतीला पाणीपुरवठा व्हावा, दिवसा वीज मिळावी, यासाठी शेतकऱ्यांना शेतक-यांना वैयक्तिक शेततळे आणि सौरऊर्जा योजनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये विशेष लक्ष घालण्याच्या सूचनाही डॉ. सावंत यांनी केल्या.

शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचाही आढावा घेत डॉ. सावंत यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बँकांनी सिबील स्कोअरची अट घालून शेतकऱ्यांना ऐन पेरणीकाळात अडचणीत आणू नये. कारण राज्य शासनाने किंवा संबंधित यंत्रणेने अशी अट घातलेली नाही. यावर्षी पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक पूर्ण होणे आवश्यक असून, जिल्हाधिका-यांनी लवकरच बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्याचे पालकमंत्री डॉ. सावंत यांनी निर्देश दिलेत.जिल्ह्यात तुती लागवडीला प्रोत्साहन देऊन त्या पीक लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेतला. त्यामध्ये केंद्र व राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री पिक विमा योजना, हवामान आधारित फळपिक विमा योजना, गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, फळबाग लागवड, प्रधानमंत्री कृषि सूक्ष्म सिंचन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांर्गत येणाऱ्या योजना, नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प (पोकरा) आदींचा यावेळी आढावा घेतला.     

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सततच्या पावसामुळे झालेले पिकांच्या नुकसानीबाबत पीकविम्याची रक्कम अद्याप न मिळाल्याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. तसेच तुती लागवडीखालील क्षेत्र, वीजजोडणी, फळबाग लागवड योजना, उत्कष्ट कृषि निविष्ठांचा पुरवठा, पीककर्ज वाटपाचे उद्द्ष्टि पूर्ण करणे, बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कृषि केंद्रचालकांवर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना सांगितले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही पालकमंत्र्यांनी जिल्हा व कृषि विभागाकडून आढावा घेतला.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या