🌟विश्व परिचारिका दिवस १२ मे विशेष : परिचारिकांविना : सुना सुना दवाखाना....!


🌟परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १२ मे आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक परिचारिका दिन म्हणून होतो साजरा🌟

     चीनच्या वुहान शहरापासून वाढत गेलेल्या कोरोना विषाणूच्या प्राणघातक संसर्गाने जगभर धुमाकूळ घातला. भारतातही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाच्या मोठ्या लढ्यात डॉक्टर, परिचारिका, पोलीस दोन वर्षांपासून चोख भूमिका बजावत आहेत. जागतिक स्तरावर मातृदिन, पितृदिन आणि आणखी काही दिवस साजरे केले जातात. तसेच रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. 


सन १९७१ मध्ये आंतराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नाईटिंगल यांचा जन्म ज्या तारखेला झाला, तो दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून अख्ख्या विश्वाच्या पाठीवर १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. फ्लोरेन्स नाईटिंगल या धनाढ्य कुटुंबातून आल्या होत्या. तरीही त्यांनी आपले सर्व जीवन रुग्णसेवेला अर्पण करण्याचा निर्णय घेतला. अनेक आधुनिक सुश्रुषा पद्धती त्यांनी विकसित केल्या. लंडनमध्ये त्यांनी केलेल्या रुग्णसेवेमुळे सैनिकांचा मृत्यू दरही ६९ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आला होता. त्या रात्री जागून तासनतास रुग्णांची सेवा करत असत. रात्री हातात लँप- कंदील घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असत. त्यामुळे त्यांना लॅम्प लेडी असेही म्हटले जात असे. थोडक्यात त्यांची माहिती-

    फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म १२ मे १८२० रोजी झाला. त्या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. इ.स.१८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धादरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना लेडी विथ द लॅम्प असेही म्हणत. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले, या भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या. रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनेन्ट यांनी त्यांना लेडी विथ द लॅम्प ही उपाधी दिली. त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रूग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये जागतिक परिचर्यादिन म्हणून साजरा केला जातो. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना बालपणापासूनच गणितात गती होती. आकडेवारी आलेखांच्या माध्यमातून दृश्य सादरीकरण करणे, हे त्याकाळात फारसे प्रचलित नव्हते. विल्यम प्लेफेअर यांनी विकसित केलेल्या पाय आकृतीसारख्या आलेखांचा त्यांनी परिणामकारकरित्या वापर केला. नाइटिंगेल यांचे संख्या शास्त्रातील सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे त्यांनी विकसित केलेली ध्रुवीय क्षेत्र आकृती होय. या प्रकारच्या आलेखास नाइटिंगेल रोझ प्लँट असेही म्हटले जाते. स्वतः काम करीत असलेल्या लष्करी रुग्णालयातील दर महिन्यातील मृत्यूंची संख्या व कारणे यांचे सादरीकरण करण्यासाठी त्यांनी या आकृतीचा वापर केला. एरवी आकडेवारीच्या जंजाळामुळे संसद सदस्य आणि सरकारी अधिकारी यांच्याकडून असे अहवाल दुर्लक्षित राहात असत. परंतु नाइटिंगेल यांनी केलेल्या प्रभावशाली दृश्य सादरीकरणामुळे सैनिकांसाठीच्या वैद्यकीय सुविधा किती अपुऱ्या आहेत? याची जाणीव होऊन या वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले. या सर्व कामामुळे रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सभासद होण्याचा सन्मान सन १८५९ साली नाइटिंगेल यांना प्राप्त झाला. पुढे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनने देखील त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले गेले. त्यांचे दि.१३ ऑगस्ट १९१० रोजी दुःखद निधन झाले.

     परिचारिकांना आजही अनेक समस्या भेडसावत आहेत. तरीही त्या रुग्णसेवेला प्राधान्यक्रम देत त्या रुग्णांची सेवा करीत असतात. हजारो परिचारिका वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय कार्यरत आहेत. मध्यंतरी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही परिचारिकेचा गणवेश परिधान करून नायर रुग्णालयाला भेट दिली होती. किशोरी पेडणेकर यांनी काही वर्षांपूर्वी नायर रुग्णालयात परिचारिका म्हणून आपली सेवा बजावली होती. कोविड युद्धात स्वतः उतरून त्यांनी एकप्रकारे परिचारिकांना मानवंदना दिल्याचे सांगितले जाते. कोणत्याही रुग्णालयातील रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकेच्या देखरेखीखाली असतो. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची त्या अहोरात्र सेवा करीत असतात. रुग्णाला सकारात्मकता प्रदान करणे व त्यांना आनंद देणे हे महत्त्वाचे कार्य त्या करीत असतात. आताच्या घडीलाही कोरोनासारख्या महाभयंकर व जीवघेण्या संकटकाळात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. कुटुंबांची, मुलांची, प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र झटून त्या आपली सेवा अत्यंत चोखपणे बजावत असतात. अनेक रुग्णालयातील परिचारिका तर गेले कित्येक दिवस आपल्या घरीदेखील गेल्या नाहीत. वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे योगदान अमूल्य असेच आहे. त्यांच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जाऊ शकत नाही. वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. कोरोना संकटकाळात त्या खऱ्या योद्धा बनून अहोरात्र रुग्णसेवा करत आहेत. त्यांच्या कार्याला माझा या शब्दप्रपंचाने सलाम!

!! रुग्णसेवेत सर्वस्व पणाला लावणाऱ्या जगातील समस्त सिस्टर्सना कोटी कोटी सॅल्यूट !!

श्री निकोडे कृष्णकुमार- अलककार.

मु.गडचिरोली,फक्त व्हा.नं. ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या