🌟गंगाखेडकरांचे प्रेम आयुष्यभर विसरणार नाही - सुधीर पाटील


🔹संतांच्या भूमीची मातीही प्रेमळ - सौ. पाटील 

गंगाखेड (दि.३० एप्रिल) :- ऐकलेल्या चर्चेमुळे गंगाखेडला जॉईन होताना मनात थोडी धाकधुकच होती. पण ईथे येवून प्रत्यक्ष काम केल्यानंतर मात्र एक प्रकारचे समाधान आणि गंगाखेडकरांचे खूप सारे प्रेम सोबत घेवून जातो आहे. गंगाखेडवासीयांनी दिलेले हे प्रेम मी आयुष्यभर विसरू शकणार नाही, असे भावनीक प्रतिपादन गंगाखेडहून नगर येथे बदली झालेले ऊपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले. 

श्री पाटील यांच्या बदलीनंतर सवंगडी कट्टा समुह आणि लॉयन्स क्लबच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. शहरातील द्वारका सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष तापडिया हे होते. मुख्याधिकारी संतोष लोमटे, सामाजिक कार्यकर्त्या मंजू दर्डा, सौ. भारती सुधीर पाटील, श्री साई सेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव, बाळासाहेब राखे आदिंची प्रमुख ऊपस्थिती होती. 


या प्रसंगी बोलताना सुधीर पाटील यांनी आपल्या साडेतीन वर्षाच्या कार्यकाळातील अनेक अनुभव कथन केले. खासकरून कोरोना काळातील आव्हानांचा सामना करत असताना सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळींच्या योगदानाचा त्यांनी आवर्जून ऊल्लेख केला. गंगाखेडला बदली म्हणजे शिक्षा नव्हे, तर एक चांगला आणि अविस्मरणीय अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. ईथे बदली झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही आपण हेच सांगत असल्याचे ते म्हणाले.

सौ.भारती सुधीर पाटील यांनीही  आपल्या भावना व्यक्त केल्या. गंगाखेड ही संत जनाबाई यांची जन्मभूमी आहे. संताच्या या नगरीतील मातीतच वेगळी ओढ आणि प्रेम जाणवल्याचे त्यांनी सांगीतले. गोविंद यादव, बाळासाहेब राखे, मंजू दर्डा आदिंची समायोचीत भाषणे झाली. प्रास्तावीक प्रा. मुंजाजी चोरघडे यांनी सुत्रसंचालन अजय सुपेकर यांनी तर आभार प्रदर्शन संयोजक रमेश औसेकर यांनी केले. सवंगडी कट्टा समुहाचे सर्व सदस्य या प्रसंगी ऊपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज नाव्हेकर, गजानन महाजन, कारभारी निरस, अतुल तुपकर, दिलीप सोळंके नागेश कोनार्डे, शाम कुलकर्णी आदिंनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या