🌟परभणीत हजारो मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर सामुहीक प्रार्थनेद्वारे रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मागितली दुआ....!


🌟परभणीसह जिल्ह्यात रमजान ईद निमित्त सामूहीक प्रार्थना🌟


परभणी (दि.२२ एप्रिल) : परभणी शहरासह जिल्ह्यात आज शनिवार दि.२२ एप्रिल रोजी रमजान ईद निमित्त ठिकठिकाणी हजारो मुस्लिम बांधवांनी सामुहिक प्रार्थना करीत दुआ मागितली. तसेच ईद निमित्त गाठीभेटी घेवून एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या.


परभणीतील ईदगाह मैदानावर ईद निमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सकाळी साडेआठ वाजता मुस्लिम बांधवांनी सामुहिक प्रार्थना अदा केली. यावेळी हजारो बांधव उपस्थित होते. त्यामुळे हे मैदान चोहोबाजूंनी गर्दीने फुललेले होते. जिंतूर रस्त्यावरील दुतर्फा वाहतूक या दरम्यान पोलिस यंत्रणेने पूर्णतः वळविल्याने वाहतूकीस अडथळा आला नाही. ईदगाह मैदानावर सुरळीतपणे, शांततेत सामूहीक प्रार्थनेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

मौलाना हाफेज मोहम्मद शफी मेहराजजी यांनी ईद-उल-फित्रची सामुहीक नमाज पठण केली. यावेळी सर्व विश्‍वातील नागरीकांना शांतता आणि सुखाकरीता दुआ मागण्यात आली. यावर्षी सर्व बांधवांची सर्वांची सोय व्हावी, या दृष्टीकोनातून दर्गा रस्त्यावरील उर्स मैदान, धार रस्त्यावरील खुले मैदान तसेच गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्यालगतच्या मैदानावर सामुहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. या चारही ठिकाणी सकाळी साडेआठ वाजता मुस्लिम समाजातील मौलवींनी सामुहिक प्रार्थना घेतली. ईदचा संदेश दिला. मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केल्यानंतर एकमेकांच्या गाठीभेटी घेवून ईदच्या शुभेच्छा दिल्या.

                खासदार श्रीमती फौजिया खान, जिल्हाधिकारी सौ. आंचल गोयल, जिल्हा पोलिस अधिक्षक आर. रागसुधा, महापालिकेचे उपायुक्त मनोज गग्गड, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, ज्येष्ठ नेते विजय वाकोडे, ज्येष्ठ नेते इरफानूर रहेमान खान, काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, माजी नगरसेवक गणेश देशमुख,  माजी नगरसेवक रवि सोनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

                जिल्हा प्रशासनातर्फे ईदगाह मैदानावर खास तंबू उभारण्यात आला होता. या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, महानगरपालिका, जिल्हा वक्फ बोर्ड, अग्निशामक दल, पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकारी-कर्मचार्‍यांनी या चारही ठिकाणी प्रार्थना सोहळा शांततेत व सुरळीत पार पडावा या दृष्टीने सर्वतोपरी उपाययोजना केल्या होत्या. दरम्यान, जिल्ह्यात तालुकास्थानांसह अन्य सर्कलच्या ठिकाणांमधून ईदगाह मैदानावर सामुदायिक प्रार्थना अदा करण्यात आली.

* महानगरपालिकेद्वारे चोख व्यवस्था :-

                महापालीकेच्या आयुक्त तथा प्रशासक तृप्ती सांडभोर यांच्या आदेशानुसार ईद निमित्त महानगरपालिकेच्या वतीने मुख्य बाजारपेठेची, प्रार्थना स्थळांची व परिसराची साफसफाई करण्यात आली.  जिंतूर रस्त्यावरील ईदगाह मैदान, धार रस्त्यावरील अमीन साहब बाबा दर्गा मैदान, साखला प्लॉट पिंगळगड परिसर या तीन ठिकाणी मुरूम टाकून दबई करून घेण्यात आली. तसेच संपूर्ण परिसराला बॅरेकेटींग करण्यात आले होते. नमाजच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या परिसरातील रस्त्यांची, नाल्यांची स्वच्छता करून मोकाट जनावरे फिरणार नाहीत याची देखील काळजी घेतली. तीनही मैदानावर महानगरपालिकेच्या वतीने मंडप टाकून स्वागत कक्ष उभारण्यात आला. या ठिकाणी मुस्लिम बांधवांना महानगरपालिकेकडून शुभेच्छा देण्यात आल्या. ईदगाह मैदानावर दिपक कानडे यांच्या नेतृवात अग्निशमन यंत्रणा तैनात करण्यात आली. या ठिकाणी मनपाच्या स्वागत कक्षामध्ये उपायुक्त मनोज गग्गड, सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख, नगरसचिव विकास रत्नपारखे, माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, भांडारपाल रामेश्‍वर कुलकर्णी, राहुल दुतडे, लक्ष्मण जोगदंड, कुणाल भारसाकळे, करनिरीक्षक रमेश कोल्हे, ज्ञानोबा तळेकर, सुभाष पालकर, मुकदम किरण गायकवाड,केशव पैके,खुळे आदीनी मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या. साखला प्लॉट येथील मैदानावर मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, न्यायरत्न घुगे, मिलिंद गालफाडे, रमेश गुगाणे, आसाराम शेळके आदींनी शुभेच्छा दिल्या तर धार रोड येथील मैदानावर पवन देशमुख, बालाजी सोनवणे, स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने,सौरभ जोगदंड, मुख्य लिपिक सुधाकर केंद्रे, दिगंबर जाधव, किरण ठाकूर, मोकिंदा ढाले, प्रकाश काकडे आदीनी मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या