🌟परवानगी पेक्षा जास्त बांधकाम प्रकरणी महानगरपालिकेला उच्च न्यायालयाचा दणका...!


🌟अमरजीतसिंग गिल यांच्या याचिकेवर मनपा आयुक्त यांना कारणे दाखवा नोटीस🌟 

नांदेड/प्रतिनिधी- महानगरपालिका हद्दीतील वजिराबाद क्षेत्रीय कार्यालय क्र.4 अंतर्गत येणाऱ्या गुरुद्वारा गेट क्र 6 जवळील मालमत्ता धारकाने परवानगी पेक्षा जास्त केलेले बांधकाम पाडण्यास अकार्यक्षम ठरणाऱ्या महानगरपालिकेला अमरजीतसिंग गिल यांच्या याचिकेवर आयुक्त यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून विहित कालावधीमध्ये खुलासा देण्याचा आदेश देऊन दणका दिला आहे.

     वजीराबाद क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या गुरुद्वारा गेट नंबर 6 मध्ये मालमत्ता धारक मनोहरसिंग फत्तेसिंग मल्होत्रा शहीदपुरा यांचे मनपा घर क्रमांक 3 -6 -378 करिता बांधकाम परवाना देण्यात आला आहे. परंतु सदर मालमत्ताधारकाने परवानगीपेक्षा जास्त अनधिकरित्या बांधकाम केल्याने त्या विरोधात अमरजीतसिंग पंजाबसिंघ गिल यांनी महानगरपालिकेला तक्रार दिली होती. यावर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 53 व 54 ची नोटिस देण्यात आली. परंतु महानगरपालिकेने पुढील कारवाई न करता सदर बांधकाम पाडण्यामध्ये दिरंगाई केल्याने तक्रारकर्ता अमरजीतसिंग गिल यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर खंडपीठांमध्ये याचिका दाखल करून मनपा आयुक्त, सहाय्यक आयुक्त वजीराबाद व मालमत्ता धारकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती.

     याचीकाकर्त्यांची बाजू अँड. विक्रम कदम यांनी मांडली त्यावर न्या. नितीन सांबरे व एस.जी चपळगावकर यांनी 21 एप्रिल 2023 रोजी निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार संबंधित चार पार्टींना न्यायालयाने 18 जुलै 2023 पर्यंत भूमिका लेखी स्वरूपात मांडण्याचे आदेश दिले आहेत. अनधिकृत बांधकाम रोखण्यास अकार्यक्षम ठरलेल्या मनपा प्रशासनास या आदेशामुळे मोठा दणका बसला असून महानगरपालिका प्रशासन तातडीने कामाला लागले आहे. सदर आदेश महानगरपालिकेत धडकताच अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या