🌟परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीसाठी झाले ९७.४१ टक्के मतदान....!


🌟अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिली आहे🌟

परभणी (दि.२८ एप्रिल) : परभणी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी मतदानाच्या टप्प्यात आज शुक्रवार दि.२८ एप्रिल रोजी सर्वच मतदारसंघात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला या समितीसाठी एकूण ९७.४१ टक्के एवढे मोठे मतदान झाले आहे.

               सहकारी संस्था मतदारसंघात १ हजार २९ मतदारांपैकी पैकी १ हजार १५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. व्यापारी व आडते मतदारसंघात ९९५ पैकी ९४४,ग्रामपंचायत मतदारसंघात ९७६ पैकी ९६० तर हमाल व तोलारी व्यापारी मतदारसंघात ४३७ पैकी ४२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ३ हजार ४३७ मतदारांपैकी ३ हजार ३४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिली.

                जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील केंद्रांवर बाजार समितीच्या संचालकांकरीता शुक्रवारी सकाळपासून मतदानास सुरुवात झाली. सकाळच्या टप्प्यातच मतदारांनी मतदानाकरीता रांगा लावल्या. त्यामुळे या निवडणूकीत लक्षणीय मतदान होईल, असे स्पष्ट चित्र दिसत होते. विशेषतः निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराने, पॅनलप्रमुखांसह नेतेमंडळींनी एकूण एक मतदान व्हावे, या दृष्टीने भक्कम मोर्चेबांधणी केली. प्रत्येक मत पदरात पडावे म्हणून सकाळपासून आटापिटा सुरु केला होता. सकाळी ०७ वाजता फुले विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर दुतर्फा विरोधी पॅनल धारकांनी पेन्डॉल टाकून मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्याकरीता चंग बांधला होता. महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेसच्या नेतेमंडळींसह उमेदवारांनी ठाण मांडून अधिकाधिक मतदानाकरीता प्रयत्नांची पराकाष्टा केली.

               ज्येष्ठ नेते आमदार सुरेश वरपुडकर, खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, समशेर वरपुडकर, अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार, अतूल सरोदे हे या केंद्रावर ठाण मांडून होते. तर भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रमोद वाकोडकर, ज्येष्ठ नेते एकनाथ साळवे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन महासंघाचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख आदी केंद्रावर ठाण मांडून होते.

              या नेतेमंडळींपाठोपाठ त्यांचे समर्थक व इच्छुकांचा मित्र परिवारसुध्दा मोठ्या संख्येने या केंद्रावर ठाण मांडून होता. यामुळेच जिंतूर रस्त्यावरील इदगाह मैदान, फुले विद्यालयाचे मैदान, नूतन शाळेचे मैदान वाहनांसह गर्दीने फुलले होते. जिंतूर रस्त्यावरील वाहतूकसुध्दा अधूनमधून ठप्प होत होती. सायंकाळी उशीरापर्यंत हेच चित्र होते. अधूनमधून ताण-तणावही उद्भवत होता. परंतु, नेतेमंडळींसह इच्छुकांनी संयमाने स्थिती हाताळली. सहकार खात्याचे अधिकारी-कर्मचारी, पोलिस कर्मचारी या केंद्रांवर मतदानाचा टप्पा शांततेत व सुरळीत पार पडावा म्हणून कार्यरत होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या