🌟बालविवाह मुक्त परभणीसाठी जिल्हाधिकारी यांची विशेष उद्बोधन कार्यशाळा.....!


🌟जिंतूर तालुक्यामध्ये माऊली मंगल कार्यालय येथे भव्य स्वरूपात किशोरवयीन बालिकांची उद्बोधन कार्यशाळा संपन्न🌟

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

बाल विवाह मुक्त परभणीच्या अनुषंगाने समाजामध्ये, बालक-बालिकांमध्ये जनजागृती व्हावी. तालुका आणि ग्राम बालसंरक्षण समिती, बालविवाह निर्मूलन समिती यांना प्रेरणा मिळावी आणि बालविवाह मुक्ती संदर्भाने प्रत्येक समिती सदस्याला नेमकेपणाने आपले कार्य समजावे. बालविवाहाला बळी पडणाऱ्या किशोरवयीन मुली यांना बालविवाहाचे दुष्परिणाम समजावेत आणि त्यांनी स्वतः बालविवाह विरुद्ध ठाम भूमिका घ्यावी परभणी जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात, कोणत्याही गावात कोणत्याही कुटुंबात बालविवाह होऊ नये परभणी जिल्हा हा संपूर्णपणे बालविवाह मुक्त व्हावा.या उदात्त हेतूने जिंतूर तालुक्यामध्ये माऊली मंगल कार्यालय येथे भव्य स्वरूपात किशोरवयीन बालिकांची उद्बोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेत उदबोधन, प्रबोधन करण्यासाठी स्वतः मा. जिल्हाधिकारी श्रीमती आंचलजी गोयल ह्या उपस्थित होत्या. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात किशोरवयीन बालकांची सुसंवाद साधून जनजागृती करण्याचे महत्वपूर्ण काम कार्यशाळेच्या माध्यमातून मा. जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल मॅडम करत आहेत. या संवादाच्या मदतीने मुलींच्या मनातील प्रश्न आणि शंका दूर करण्यात आल्या. समस्या कोणतीही असो ती सोडवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे सांगून मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले.  तुम्ही सर्व मुली उद्याच्या अधिकारी आहात सकारात्मक राहून मनापासून अभ्यास करा अशा शुभेच्छा ही दिल्या. यासोबत किमान पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये बालविवाह करायचा नाही. अशी खुणगाठ मनाशी घट्ट बांधून ठेवा. जिल्हाधिकारी म्हणून मी स्वतः आणि आमचे संपूर्ण प्रशासन बालविवाह थांबवण्याचा प्रयत्न करत आहेच सोबत तुम्ही सर्व मुलींनी ठरवले तर परभणी जिल्हा खात्रीने बालविवाह मुक्त होईल.

उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती अरुणा संगेवार मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये बालविवाहाची कारणे आणि दुष्परिणाम विशद केले. त्याचबरोबर जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासनाकडून सुरू असणाऱ्या उपायोजना विषयी सविस्तर माहिती सांगितली. परभणी जिल्ह्यात अनेक बालविवाह रोखण्यात आले. ही खऱ्या अर्थाने अभिनंदनीय बाब आहे. शासन प्रशासन बालविवाह थांबवण्यासाठी आपल्या परीने कसोशीने प्रयत्न करत आहे पण यासोबतच सर्व बालक-बालिका आणि त्यांच्या पालकाने ही जागृत होणे गरजेचे आहे.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) जिल्हा परिषद परभणी श्री जाधव सर यांनी आपल्या  सविस्तर मार्गदर्शनांमधून बालविवाह म्हणजे काय...? याविषयी माहिती सांगितली. बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्याविषयी माहिती सांगितली. या कायद्याच्या अनुषंगाने बालविवाह करणे आणि बालविवाहास मदत करणे या दोन्ही कृती दंडणीय गुन्हा आहे. खऱ्या अर्थाने बालविवाह थांबवायचा असेल तर सर्वांनी सजग व जागरूक राहणे गरजेचे आहे. लग्नकार्य संदर्भात काम करणाऱ्या सर्वांनी काम स्वीकारण्यापूर्वी वधू-वराच्या वयाची खात्री करणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर लग्नकार्यास उपस्थित राहणाऱ्यांनी सुद्धा वधू-वर सज्ञान आहेत का...? याची खात्री करूनच विवाह कार्यास उपस्थित राहावे. अन्यथा सर्वांवर गुन्हा दाखल होऊ शकतो हे सांगितले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना गटशिक्षणाधिकारी गणेश गांजरे यांनी बालविवाह मुक्त परभणी च्या अनुषंगाने जिंतूर तालुक्यात सुरू असणाऱ्या कार्याविषयी माहिती दिली व्यासपीठावरील प्रमुख मान्यवरांसोबत तहसीलदार अमित घाडगे गटविकास अधिकारी भाऊसाहेब खरात गटशिक्षणाधिकारी गणेश गाजरे आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन साहित्यिक मयूर जोशी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख मारुती घुगे यांनी केले.

या कार्यशाळेमध्ये बालविवाह मुक्ती प्रतिज्ञा अनिल स्वामी यांनी उपस्थित सर्वांना दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  विविध समित्यांचे गठन करून उत्तम पद्धतीने नियोजन केले. संपूर्ण कार्यशाळा संपन्न होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, केंद्रप्रमुख, कर्मचारी बंधू-भगिनी, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य,  मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या