🌟परभणी जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन चळवळ लोक चळवळ बनवू - जिल्हाधिकारी आंचल गोयल


🌟पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळीत आयोजित बालविवाह प्रतिबंध समितीच्या बैठकीत बोलतांना त्या म्हणाल्या🌟


परभणी (दि.२० एप्रिल) : बालविवाह कायदा सन २००६ साली लागू झाल्यानंतर सुध्दा दुर्दैवाने अजूनही बालविवाह होतांना दिसत आहेत. त्यामागे अनेक कारणे जरी असले तरी शंभर टक्के बालविवाह निर्मूलन होणे काळाची गरज आहे.अन् ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, म्हणून बालविवाह निर्मूलन ही लोक चळवळ बनवूया, असे आवाहन जिल्हाधिकारी सौ. आंचल गोयल यांनी धनगर टाकळीत (ता. पूर्णा) या ठिकाणी बालविवाह प्रतिबंध समितीच्या बैठकीप्रसंगी केले.

            जर एखाद्या गावात पहिलीच्या वर्गात शंभर विद्यार्थिनी शिक्षण घेत असतील तर त्या वर्गातील इयत्ता नववीला केवळ साठ मुलीच पाहायला मिळू लागल्या आहेत. मग बाकी चाळीस मुली कोठे गेल्या? तर त्यांचे कोणत्या ना कोणत्या कारणाने बालविवाह झालेले आढळून येवू लागले आहेत. बालविवाह केल्याने कमी वयात गरोदर झाल्यामुळे अपरिपक्व बालकांना जन्म दिला जातो व प्रसंगी प्रसूतीच्यावेळी मातेचा मृत्यू  पण होतो आहे. याचे जिंतूर तालुक्यात उदाहरणं आहेत, असे जिल्हाधिकारी सौ. गोयल यांनी म्हटले.

            ही केवळ बाल विवाह प्रतिबंध समितीच जबाबदारी नाही तर सबंध समाजाची जबाबदारी आहे. म्हणून आपण सर्वजण बालविवाह वर प्रतिबंध लावूया आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवूया, असे त्या म्हणाल्या. अनाथ मुलींसाठी कस्तुरबा गांधी विद्यालय सुरू करण्यात आले आहेत. त्यातून मुलींना मानधन, मोफत  शिक्षण  देण्याची व्यवस्था शासनाने केली आहे, असे स्पष्ट केले.

           दरम्यान, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. मिराताई  सईनाजी माठे (साखरे) होत्या. समितीचे सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विविध विभागाचे कर्मचारी बैठकीला उपस्थित होते. याप्रसंगी ग्राम पंचायत, राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूलच्या वतीने जिल्हाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या