🌟परभणी जिल्ह्यातील दुचाकी वाहनधारकांना आता हेल्मेट सक्ती....!


🌟जिल्हाधिकारी आंचय गोयल यांनी दिल्या सर्व कार्यालय प्रमुखांना सूचना🌟

परभणी (दि.06 एप्रिल) : परभणी जिल्ह्यातील सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालूनच प्रवास करावा विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविताना आढळून आल्यास संबंधित दुचाकी वाहनधारका विरोधात मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिला आहे.

              मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 129 मध्ये नमुद केल्यानुसार कोणतेही दोनचाकी वाहन रस्त्यावर चालविताना हेल्मेट परिधान करणे हे सक्तीचे आहे. याबाबत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परिपत्रक काढून सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. तसेच वेळो-वेळी  उच्च न्यायालय व  सर्वोच्च न्यायालय यांनी देखील दुचाकी वाहन चालवतांना हेल्मेट घालणे हे सक्तीचे असल्याबाबत निर्णय दिलेले आहेत. तसेच वाहन चालविताना हेल्मेट वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असल्याचे जिल्ह्यातील अपघाताचे विश्‍लेषण पाहिले असता दिसून आले आहे. यामध्ये बहुतांश दुचाकीस्वारांनी प्राणही गमावले आहेत, असे परिपत्रकात नमूद केले.

             महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त मुंबई यांनी संदर्भीय पत्रानुसार शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये कामकाजानिमित्त येणारे बहुतांशी नागरिक तसेच कार्यालयातील कर्मचारी- अधिकारी हे विनाहेल्मेट दुचाकी वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले असल्याचे  कळविले आहे. त्यावरून जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षा  आंचल गोयल यांनी या परिपत्रकाद्वारे जिल्ह्यातील सर्व कार्यालयप्रमुखांना सुचना दिल्या आहेत. सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांना कार्यालयात दुचाकीवर येतांना हेल्मेट अनिवार्य करावे, अशा सुचना जारी केल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाही सूचना दिल्या आहेत. सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालूनच प्रवास करावा. अन्यथा, विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविताना आढळून आलेल्या नागरिक, कर्मचारी, अधिकारी यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

               मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 129 चे उल्लंघन केल्यास वाहन चालकास 1 हजार रूपये व मालकास 1 हजार रूपये दंड आणि अनुज्ञप्ती (लायसन्स) 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल. तसेच अल्पवयीन चालकाच्या पालकावर फौजदारी गुन्ह्याची कार्यवाही करण्यात येईल, असे परिपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, या अनुषंगाने परभणी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक दि. 27 मार्च 2023  रोजी झाली होती. त्यामध्ये हेल्मेट सक्तीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली होती.

🔴जिल्हा प्रशासनाद्वारे तपासणी मोहिम :-

              हेल्मेट सक्तीबाबतचे हे आदेश दि.1 एप्रिल 2023 पासून अंमलात आले असून पुढील कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून तपासणी मोहिम राबविण्यात येईल. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांना सुचना दिलेल्या असून शासकीय कार्यालयात येणारे नागरिक, कर्मचारी व अधिकारी यांना विना हेल्मेट दुचाकी वाहनावर प्रवास केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, याची माहिती देण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी गोयल यांनी दिल्या आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या