🌟महाविकास आघाडीच्या पहिल्या वज्रमुठ संयुक्त सभेसाठी छत्रपती संभाजीनगर सज्ज....!


🌟महाविकास आघाडी करणार आज महागर्जना🌟

✍️मोहन चौकेकर 

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या पहिल्या वज्रमुठ संयुक्त सभेसाठी छत्रपती संभाजीनगर सज्ज झाले आहे. महाविकास आघाडीच्या सभेला काही लोकांनी अडथळा निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परंतु सर्व अडथळे दूर करून रविवार, २ एप्रिल रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडी महागर्जना करणार आहे.  


महाविकास आघाडीच्या पहिल्याच सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. संभाजीनगर मध्ये 'चलो मराठवाडा सांस्कृतिक मंडळ' असे फलक जागोजागी दिसून येत आहेत. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सभेला मार्गदर्शन करणार आहेत. 

छत्रपती संभाजीनगर येथे रविवार, २ एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या भव्य जाहीर सभेतून मविआची महागर्जना ऐकायला मिळणार आहे. सभेला अवघे काही तास उरले असतानाच काहींनी सभा न होण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केला. परंतु सभा होणारच अशी ठाम भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. 

शिवसैनिक, काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी घरोघरी जाऊन सभेचे निमंत्रण देत आहेत. सभेच्या तयारीसाठी मराठवाड्याचा कानाकोपरा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पिंजून काढला आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात  बैठका घेण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीच्या सभेसाठी संपूर्ण मराठवाड्यातून लोक येणार असून त्याचे व्यवस्थित व शिस्तबद्ध असे नियोजन करण्यात आले आहे. 

आज शिवसेना नेते सुभाष देसाई, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, आ.अनिल परब, आ.सुनिल प्रभू, यांनी आज सभेच्या स्थळाची पाहणी करून आढावा घेतला याप्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले,काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, आनंद तांदुळवाडीकर, किरण डोणगावकर, भाऊसाहेब जगताप, शहरप्रमुख विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी,उपशहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, राजेंद्र दानवे यांची उपस्थिती होती.

* मविआची पहिली सभा विशाल होणार आहे :- 

कोणत्याही निवडणूका आल्या तरी महाविकास आघाडी त्याला सामोरे जाऊन जिंकून दाखवेल, असा विश्वास जनतेला या सभेतून दिला जाणार आहे, असे सुभाष देसाई यांनी म्हटले.

* महाविकास आघाडीच्या सभेला खालील मान्यवर उपस्थितीत राहणार :-

शिवसेना - शिवसेना नेते आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार संजय जाधव, ओमप्रकाश राजेनिंबाळकर 

काँग्रेस - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोकचव्हाण, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, खासदार रजनी पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, राजेश टोपे, संजय बनसोडे, खासदार फौजिया खान 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या