🌟राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने सुचविलेल्या त्रुटी बद्दल शासनस्तरावर अपील करणार.....!


 🌟लवकरात लवकर त्रुटी पूर्तता करणार अधिष्ठाता डॉ.संजयकुमार मोरे यांची ग्वाही🌟

परभणी (दि.२६ एप्रिल) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून  प्रवेश प्रक्रियेला मान्यता मिळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच या शैक्षणिक वर्षात निश्चितपणे येथे प्रवेश होतील. मात्र, या सर्व प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने महाविद्यालयाच्या सोयी सुविधांबाबत काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत. या त्रुटीबाबत शासन स्तरावरून लवकरात लवकर पूर्तता करण्यात येईल, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.   

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी नुकतीच परभणी येथील आयटीआयच्या इमारतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान आयोगातील सदस्यांनी पाहणीदरम्यान लक्षात आणून दिलेल्या त्रुटींची लवकरच पूर्तता करण्यात येणार असून, त्याबाबत नवी दिल्ली येथे शासन स्तरावरून अपिल दाखल करण्यात येणार असल्याचेही डॉ. मोरे यांनी कळविले आहे.

परभणी जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी १७ सप्टेंबर २०२१ रोजी घोषणा केली  व २८ मार्च २०२२ रोजी तसा शासन निर्णयही काढण्यात आला. त्यामुळे येथील महाविद्यालय सुरु करण्यासाठी शासनस्तरावरून वेगवान हालचाली सुरु झाल्या. राज्य शासनाने येथील महविद्यालयाला मंजुरी  देत मुबलक निधी आणि ब्राह्मणगाव येथे २० हेक्टर जागाही उपलब्ध करून दिली. त्यासाठी अधिष्ठाता, विशेष कार्यासन अधिकारी  व इतर महत्त्वाचे अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली. जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी देत सहकार्य  करण्याशत आले असल्याचेही डॉ. मोरे यांनी सांगितले आहे.

 राज्य शासनाने ५ ऑगस्ट २०२२ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याबाबतचे आवश्यक प्रमाणपत्रही दिले. आणि  दोनच दिवसांनी महाराष्ट्र विज्ञान ‍विद्यापीठ, नाशिकशी महाविद्यालय संलग्न करण्यात आले. तसेच १५ फेब्रुवारी २०२३ रोजी महाविद्यालयात वर्ग १ व ४ च्या ४४८ पदांना मंजुरी देण्यात आली. तसेच महाविद्यालयासाठी फर्निचर खरेदी लेखाशिर्ष निर्माण करण्याला मान्यता दिली. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे  १० ऑगस्ट २०२२ रोजी ऑनलाईन पद्धतीने अर्जही करण्यात आला आहे. त्यानंतर दोन वेळा आयोगाच्या पथकाने महाविद्यालयाची पाहणी केली. १७ एप्रिल २०२३ रोजी आयोगाने केलेल्या पाहणीत आयोगाला काही त्रुटी आढळून आल्या असून, या त्रुटींची लवकरात लवकर पूर्तता करून शासनस्तरावरून अपिल दाखल करण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी सांगितले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या