🌟जिंतूर येथील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन....!


🌟ही निबंध स्पर्धा आगळ्यावेगळ्या विषयांमुळे आणि रोख पारितोषिकांमुळे चर्चेत🌟

जिंतुर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

 जिंतूर विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिंतूर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही निबंध स्पर्धा आगळ्यावेगळ्या विषयांमुळे आणि रोख पारितोषिकांमुळे चर्चेत आली आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे जिंतूर तालुक्याच्या भौगोलिक व ऐतिहासिक स्थितीला उजाळा मिळत असून जिंतूरकर उज्वल भविष्याची स्वप्ने पाहत जुन्या आठवणींमध्ये रममाण झाले आहेत. 

या स्पर्धेचे पहिले पारितोषिक रू. 5000/-, द्वितीय रू. 4000/-, तृतीय रू. 3000/-, चतुर्थ रू. 2000/- आणि पाचवे रू. 1000/- असे असून निबंध स्पर्धेचे विषय  माझ्या स्वप्नातील जिंतूर तालुका , जिंतूर तालुका: काल, आज, उद्या , जिंतूर तालुका: जल, जमीन आणि जंगल यांचा सदुपयोग , जिंतूर तालुका: कला, संस्कृती आणि साहित्य क्षेत्रातील प्रगती , जिंतूर तालुक्यात रोजगार निर्मितीसाठी करावयाचे प्रयत्न , जिंतूर तालुक्यात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी करावयाचे प्रयत्न , जिंतूर तालुका आदर्श तालुका कसा होईल असे आहेत. 

 या निबंध स्पर्धेसाठी जिंतूर तालुक्यातील गावागावातून निबंध पाठवले जात असून वयाचे व शब्दांचे बंधन नसल्यामुळे लहान थोर अशी सर्वच मंडळी हिरीरीने सहभागी होत आहे. या निबंध स्पर्धेबाबत प्रसिद्ध झालेल्या पत्रकातील मजकुरानुसार निबंध पाठवण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 असून निकाल 10 एप्रिल 2023 रोजी घोषित करण्यात येणार आहे. निबंध हा हाताने लिहून वा टाईप करून सॉफ्टकॉपी 9930096954 या क्रमांकावर व्हाट्सअ‍ॅप करावी किंवा हार्डकॉपी ॲड. सुनिल शिवाजीराव बुधवंत, अध्यक्ष, जिंतूर विकास चॅरिटेबल ट्रस्ट, शिवालय, शिवाजीनगर, जिंतूर, या पत्त्यावर पाठवावी.

जिंतूर तालुका आदर्श तालुका होण्यासाठीची चर्चा घराघरात व्हावी तसेच जेष्ठ मंडळींकडून त्यांचे अनुभव, त्यांनी जगलेले जीवन नवीन पिढीला माहिती व्हावे व येणाऱ्या पिढीने इतिहासाकडे बघत व शिकत जिंतूरच्या सर्वांगीण भविष्याला काळानुरूप योग्य तो आकार द्यावा या आशेने आणि जिंतूर तालुक्यात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागून एक जबाबदार पिढी तयार व्हावी या अपेक्षेने जिंतूर निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. या निबंध स्पर्धेसाठी आलेल्या उत्तमोत्तम निबंधांचे संकलन करून एक पुस्तक सुद्धा प्रकाशित करण्यात येणार आहे. अशी माहिती जिंतूर विकास चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष ॲड.सुनिल शिवाजीराव बुधवंत यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या