🌟स्त्री सक्षम तरच समाज सक्षम - डॉ. अनिल कांबळे


🌟समर्थ विद्या मंदिर : 196 महिलांची आरोग्य तपासणी व उपचार🌟


परभणी (दि.11 मार्च) : आज सर्वच क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाद्वारे उत्तुंग भरारी मारीत आहेत. एक-एक क्षेत्र पादाक्रांत करीत आहेत. महिलांचे हे दमदार पाऊल निश्‍चित स्वागतार्ह, अभिमानास्पद बाब आहे, असे मत ज्येष्ठ र्‍हदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिल कांबळे यांनी व्यक्त करीत एकविसावे शतक हे आपलेच आहे. विश्‍वगुरु म्हणून आपणास या जगाचे नेतृत्व करावयाचे आहे. त्यात महिलांचे योगदान हे अनन्यसाधारण असे असणार आहे. त्यामुळेच महिलांनी सर्वार्थाने विशेषतः आरोग्याच्या दृष्टीने सक्षम बनावे, तरच समाज व देश सक्षम बनेल, असा विश्‍वासही व्यक्त केला.


जागतिक महिला दिनानिमित्ताने शनिवारी (दि.11) वसमत रस्त्यावरील दत्तधाम परिसरातील स्नेह नगरातील समर्थ विद्यामंदिरमध्ये आयोजित केलेल्या महिला आरोग्य तपासणी व उपचार शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

             यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, नूतन विद्या समितीचे सचिव संतोष धारासूरकर, सहसचिव प्राचार्य अनंत पांडे, स्वातंत्र्यवीर सावरकर शिक्षण संस्थेचे सचिव शिरीष जयपूरकर, डॉ. प्रफुल्ल पाटील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या विभागप्रमुख डॉ. भाग्यश्री वाघ, डॉ. मिनाक्षी कदम, डॉ. सुमय्या अन्सारी, प्रकाश पाटील, समर्थ विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मृदुल जोशी-धारासूरकर, लक्ष्मी महिला नागरी  पतसंस्थेच्या उपाध्यक्षा सौ. द्रोपदी गायकवाड, सचिव विद्या सोनुने, सहसचिव अनुराधा पुरी, कल्पना खटींग, अक्षदा गोरकट्टे, सायाळा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. तनूजा कापरे, जनकल्याण विद्या मंदिर शाळेच्या विभाग प्रमुख नगमा कुरेशी, मराठवाडा प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता ढगे, सौ. सुरेखा गिते, सौ. जोशी, सौ. चात्रे, सौ. सुनयना पांडे आदींची उपस्थिती होती.

            नूतन विद्या समिती, स्वातंत्र्यवीर सावरकर शिक्षण संस्था, दिलासा प्रतिष्ठान, लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था, डॉ. प्रफुल्ल पाटील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालय, पि.डी. जैन होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या शिबीरात एकूण 196 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच उपचारही करण्यात आले. त्याचबरोबर महिलांना आरोग्यविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. कांबळे यांनी आपल्या भाषणातून महिलांनी आरोग्याच्या दृष्टीने सतर्क रहावे, असे आवाहन केले. आजची महिला सर्वार्थाने सक्षम आहे. संसार सांभाळून प्रत्येक क्षेत्रात वावरत आहे. पुरुषाच्या बरोबरीने नव्हे, पुढे जावून कर्तृत्वाच्या जोरावरच प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करीत आहे. महिलांचे हे यश निश्‍चितच अतूलनीय आहे. परंतु, आपण आज विश्‍वगुरु म्हणून वाटचाल करीत आहोत. एकविसावे शतक हे आपल्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणारे आहे. नेतृत्व सिध्द करणारे ठरणार आहे. त्यात महिलांचे योगदान, कर्तृत्व हे मोलाचे असणार आहे, म्हणून महिलांनी आरोग्याकडील दुर्लक्ष थांबवावे. चांगले आरोग्य कसे राखता येईल, हे पहावे. आरोग्याच्या दृष्टीने महिला सक्षम असेल तरच समाज सक्षम राहील, असे ते म्हणाले.

              यावेळी अध्यक्षीय समारोपात जोशी यांनी आपल्या भाषणातून कर्तृत्ववान महिलांचा उल्लेख केला. त्यांचे यश, योगदान प्रेरणादायी ठरणारेच आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने सर्वार्थाने सक्षम बनावे, प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्‍वासाने उतरावे, उत्तुंग अशी भरारी मारावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

             शिबीराचे प्रास्ताविक समर्थ विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मृदुल जोशी-धारासूरकर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. मंजूषा तोडकर यांनी तर आभार दिपक गिरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी सौ. शुभांगी देशपांडे, सौ. स्वाती मुळे, सौ. सुरेखा ताकतोडे,  शुभांगी मोरे, सौ. सविता देवकते, माधव जुबरे, सचिन ठोंबरे, भागवत देशमुख, दिपक बोंगाने, शुभम लाटे, शिवम दरबेशवार, धनंजय गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या