🌟परभणी शहरातील साखला प्लॉटमधून पळविलेला मुलगा पोलिस प्रशासनाने केला पालकांच्या स्वाधीन...!


🌟जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी दिली माहिती : या प्रकरणात आणखी काही आरोपी ताब्यात🌟

परभणी (दि.१६ मार्च) : परभणी शहरातील साखला प्लॉट भागातून लहान मुलांचे अपहरण करणार्‍या आंतरराज्य टोळीने पळविलेल्या पाच वर्षीय बालकाचा जिल्हा पोलिस अधिक्षक रागसुधा आर.यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिस दलाने अत्यंत तत्परतेने तपास करीत शोध लावला. टोळीच्या ताब्यातून त्या मुलाची सुटका करीत पालकाच्या स्वाधीन करण्यात आले.

           साखला प्लॉट येथील मुन्नी बी शेख अय्युब यांनी ०५ मार्च २०२३ रोजी कोतवाली पोलिस स्थानकात एक तक्रार दाखल केली त्याद्वारे आपल्या पाच वर्षाच्या मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असे नमूद केले. कुटूंबियांनी या मुलाच्या शोधार्थ भरपूर प्रयत्न केले, परंतु मुलगा आढळून आला नाही. कोतवाली पोलिसांनी लहान मुलांचे अपहरण करुन या मुलांना लाखो रुपयांना विकणार्‍या टोळीतील काहींची विचारपूस केली तेव्हा त्यातील महिला आरोपी लक्ष्मी व्यंकटेश्‍वरलू केथावरपू (रा. गनपावरम ता. कोडाड, जि. सूर्यापेठ तेलंगना) हिच्या मार्फत चार लाख रुपयांना संघारेड्डी पालेम (जि. नलगोंडा) यास विक्री केल्याची माहिती हाती आली.

           जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती आर. रागसुधा, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ए.बी. चव्हाण, साईनाथ पुयड, नागनाथ तुकडे, व्यंकट कुसुमे, दिलावर खान, आशा सावंत, मधुकर ढवळे, निकाळजे, खुपसे, मोबीन, तुपसुंदरे, जाधव, सातपुते, जयश्री आव्हाड, गायकवाड, परसोडे, रफियोद्दीन, डुबे, पौळ, चाटे तसेच एएचटीयु येथील पोलिस निरीक्षक भावसार, पोलिस अंमलदार शकील अहेमद, रंजना किरडे, पोले, शेळके यांचे पथक नियुक्त करीत 12 मार्च 2023 रोजी अपहरण केलेल्या बालकास संघा रेड्डी पालेम (जि. नलगोंडा) येथून अख्तरबी उर्फ बाजी ताब्यात घेवून बालकल्याण समितीमार्फत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत त्या मुलास पालकांना सुपूर्त करण्यात आले.

           या कामगिरीत सायबर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जी.टी. बाचेवाड, पोलिस अंमलदार बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, संतोष वावळ, रवि भूमकर, गौस पठाण, स्वप्नील पोतदार, राजेश आगाशे यांनी तांत्रिक सहकार्य केले. दरम्यान, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या मार्फत या प्रकरणात तपास सुरु आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या