🌟पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गंत धनगर समाजातील विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित.....!


🌟पात्र विद्यार्थ्यांनी १५ मार्चपर्यंत आपले अर्ज सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे सादर करावे - सहा.आयुक्त गीता गुठ्ठे

परभणी (दि.०८ मार्च) : इतर मागास व बहुजन कल्याण विभागांतर्गंत आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या प्रस्तावानुसार आदिवासीच्या धर्तीवर धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळण्यासाठी पात्र असूनही धनगर समाजातील प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांनी १५ मार्चपर्यंत आपले अर्ज सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे. 

या योजनेंतर्गंत महानगरपालिका विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १२ वीनंतरच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय व अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतला आहे. परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्याना मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश घेतलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना ही योजना लागू राहील. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी धनगर समाजाचा असावा. विद्यार्थ्याने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न रुपये २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी रहिवाशी नसावा. विद्यार्थी इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा, इयत्ता १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील. 

विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षापेक्षा कमी नसावा. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने इयत्ता १२ वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा. त्याची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ६० टक्के असावी. विद्यार्थ्याचे कमाल वय २८ पेक्षा जास्त नसावे. धनगर समाजातील अपंग विद्यार्थ्याना सदर योजनेचा लाभ प्राथम्याने देय राहील. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करणार नसावा. विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी योजनेचा लाभ घेताना शासनाची फसवणूक केल्याचे आढळल्यास विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच योजनेअंतर्गत दिलेल्या रक्कमेची १८ टक्के दंडनीय व्याजासह वसूल करण्यात येईल. तरी जास्तीत-जास्त पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन श्रीमती गुठ्ठे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या