🌟महाविद्यालये ही ज्ञानाची ऊर्जा केंद्र असतात - ॲड. दिनेश काळे


🌟येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते🌟

पुर्णा (दि.२९ मार्च) - महाविद्यालये ही जीवनात बळ देणारी ज्ञानाची ऊर्जा केंद्र असतात असे प्रतिपादन माजी विद्यार्थी तथा पूर्णा न्यायालयातील विधी सेवा संघाचे अध्यक्ष ॲड. दिनेश काळे यांनी केले ते येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार हे उपस्थित होते. तर यावेळी मंचावर माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा. दत्ता पवार, सिनेट सदस्य प्रा. डॉ. विजय भोपाळे हे उपस्थित होते. पुढे बोलताना ॲड. दिनेश काळे म्हणाले की, महाविद्यालय आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व ग्रंथालय ही ज्ञान देणारी प्रेरणास्त्रोत असतात. ओल्या मातीला शिल्पकार जसा आकार देतो तशाच प्रकारे महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांवर संस्कार करून जीवनाला आकार देत असतात. महाविद्यालयाच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी कृतज्ञता भाव सदैव जपला पाहिजे असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांनी माजी विद्यार्थ्यांना आमचे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असते. स्पर्धा परीक्षा असो अथवा विविध प्रकारच्या कोणत्याही परीक्षा असो यासाठी  ग्रंथ पुरविले जातील असे त्यांनी माजी विद्यार्थ्यांना आश्वासित केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन माजी विद्यार्थी समन्वय समितीचे समन्वयक डॉ. प्रभाकर किर्तनकार यांनी केले तर आभार समितीचे सदस्य प्रा.डॉ.संजय कसाब यांनी केले. या मेळाव्यासाठी माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात  उपस्थित राहून सहभागी झाले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या