🌟श्रीहरी कोटा अंतराळ केंद्राच्या सहलीसाठी तालुक्यातून ८८७ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा...!


🌟यानंतर १० मार्च रोजी जिल्हास्तरीय परीक्षेचे आयोजन🌟

परभणी (दि.०३ मार्च) : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत औरंगाबाद विभागातील जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून तीन विद्यार्थी श्रीहरीकोटा अंतराळ केंद्र, उपग्रह प्रक्षेपण केंद्र, थुंबा येथील स्पेस म्युझियम व विश्वेश्वरय्या इंडस्ट्रीयल ॲड टेक्नीकल म्युझियम येथे भेट देऊन येथील कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहे. त्यासाठी केंद्रस्तरावर परीक्षा घेण्यात आली असून, आज तालुकास्तरीय परीक्षेत ८८७ विद्यार्थी सहभागी झाले होते. यानंतर १० मार्च रोजी जिल्हास्तरीय परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.  

विद्यार्थ्यांना ही सहल विमानाने घडविण्यात येणार असून, त्यासाठी केंद्र तालुका व जिल्हास्तर परीक्षेतून विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. त्‍यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यातील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या जिल्हा परिषद शाळेतील ३७ हजार ४२३ विद्यार्थ्यांनी केंद्र स्तरीय परीक्षा नुकतीच दिली. प्रत्येक केंद्रातून प्रत्येकी पाच मुले व मुलींची निवड होऊन दुसऱ्या टप्यात आज रोजी प्रत्येक तालुक्यातून सर्वोत्तम गुणधारक पाच मुलं व पाच मुलींची परीक्षा १० मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्या परीक्षेतून प्रत्येक तालुक्याच्या तीन विद्यार्थ्यांना सहलीत सहभागी होता येणार आहे. विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी मुलींच्या सहभागासाठी विशेष निकष ठेवून या क्षेत्रातील मुलींच्या सहभागाला प्रोत्साहन दिले आहे. तीनही स्तरावर या परीक्षेचे स्वरूप अधिक व्यापक करत केंद्रस्तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न, तालुकास्तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न व निबंध तर जिल्हास्तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न व प्रात्यक्षिक असे असणार आहे, असे शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी कळविले आहे.

परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती अध्यक्षा तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी दोन वेळा यंत्रणेची बैठक घेतली. यासाठी सदस्य सचिव शिक्षणाधिकारी (प्रा) विठ्ठल भुसारे यांनी पुढाकार घेऊन परीक्षा सुलभ व वस्तुनिष्ठ केली.....



*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या