🌟खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या,एफ.एम.रेडिओवरील आक्षेपार्ह प्रसारणावर संनियंत्रण समितीचे राहणार नियंत्रण....!


🌟त्यासंदर्भात प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक🌟 

परभणी (दि.०२ मार्च) :  केबल टेलिव्हीजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम १९९५ अंतर्गत दूरचित्रवाणी, स्थानिक वाहिन्या, खासगी एफ.एम. रेडिओ केंद्र आणि कम्युनिटी रेडिओवरून प्रसिद्ध होणाऱ्या आक्षेपार्ह प्रसारणावर या समितीचे नियंत्रण राहणार असून, त्यासंदर्भात प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली.  

 समिती सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, सदस्य पोलीस उपअधीक्षक (गृह) दिपक दंतुलवार, कै. सौ. कमलाताई जामकर महिला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. संगीता आवचार, श्री. शिवाजी महाविद्यालयाचे ‍(पत्रकारिता व जनसंवाद) प्रा. डॉ. सुधीर इंगळे, इलेक्ट्रॉनिक मीडियातील परभणी आकाशवाणी केंद्राचे मोहित कोहाड आदी बैठकीला उपस्थित होते.

            सर्व खासगी वाहिन्यांनी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम १९९५ चे पालन करणे बंधनकारक असून, कायद्यानुसार सर्व नोंदणीकृत खाजगी वाहिन्यांनी फ्रि-टू-एअर वाहिन्या आणि दूरदर्शन वाहिन्याचे प्रक्षेपण करणे बंधनकारक आहे. जाहिरात संहितेचे कार्यक्रमाच्या प्रसारणात उल्लंघन करणे, विविध धर्म, जाती, भाषा, वर्ग, समूह आणि समाजाच्या भावना दुखविणारे किंवा समाजात द्वेषभावना पसरविणारे प्रसारण करणाऱ्यांविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याचे व अशा प्रसारणाची तक्रार आल्यास संबंधित केबल चालकाकडून कार्यक्रमाची दृश्ये मागविण्याचे अधिकार समितीला आहेत. ज्या नोंदणीकृत खाजगी वाहिन्या किंवा एफ.एम. रेडिओ केंद्र किंवा कम्युनिटी रेडिओ केंद्रावरुन आक्षेपार्ह प्रक्षेपण करत असतील अशा वाहिन्यांची किंवा रेडिओची तक्रार प्राप्त झाल्यास या कायद्यानुसार संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच अनिवार्य वाहिन्यांच्या प्रक्षेपणात व्यत्यय येणे, सिग्नल न मिळणे अशा त्रुटी आढळल्यास किंवा तक्रारी प्राप्त झाल्यास प्राधिकृत अधिकाऱ्यांनी संबंधित केबल ऑपरेटरला समज देण्याच्या सूचना डॉ. काळे यांनी दिल्या. 

जिल्ह्यातील कार्यरत खासगी एफ. एम. रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सद्वारे हवाई प्रसारण संहितेचे पालन होते का नाही यावर लक्ष व नियंत्रण ठेवणे, तक्रारींची शहानिशा करून केवल चालक किंवा खासगी एफ.एम. रेडिओ विरुद्ध तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात येईल. एखाद्या कार्यक्रमाचा सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम होत असेल किंवा कोणत्याही समाजात असंतोष निर्माण होत असेल तर तात्काळ जिल्हाधिकारी तसेच राज्य व केंद्र शासनाच्या त्वरित नजरेस आणून द्यावेत, असे आदेश डॉ. काळे यांनी दिले.

तसेच खाजगी दूरचित्रवाणी वाहिनी किंवा एफ.एम. रेडिओ केंद्र किंवा कम्युनिटी रेडिओ केंद्रावरुन आक्षेपार्ह संदेशाचे प्रसारण होत असल्यास संबधित वाहिन्यावर कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांमध्ये सदर केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम १९९५ कायद्याबाबत विविध माध्यमातून व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यातील स्थानिक केबल ऑपरेटरमार्फत प्रसारित होत असलेल्या स्थानिक व सॅटेलाईट वाहिन्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित केवल ऑपरेटर यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यालय अथवा सक्षम प्राधिकारी यांना किमान पाच केबल जोडण्या मोफत देणे आवश्यक आहे. जेणेकरुन सदर वाहिन्यावरुन प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह कार्यक्रम व जाहिरातीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत आक्षेपार्ह कार्यक्रम व जाहिरातीबाबत एकही प्रकरण दाखल झाले नसल्याचे सांगून खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ.एम. रेडिओ केंद्रे तसेच कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून होणान्या प्रसारित होणाऱ्या सामुग्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम १९९५ चा उद्देश आणि कार्यक्षेत्र याची सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांनी माहिती दिली. 

यासाठी जिल्हा माहिती कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्ह्यातील स्थानिक वाहिन्यांबाबत जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी असतील, तर त्या त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, पहिला मजला, शासकीय इमारत, परभणी येथे सादर कराव्यात. तसेच प्राप्त तक्रारी समितीसमोर ठेवण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती देत जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव अरुण सूर्यवंशी यांनी आभार मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या