🌟परभणीत जागतिक महिला दिनानिमित्त भव्य रॅली संपन्न....!

 🌟विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा देखील करण्यात आला सत्कार🌟


परभणी, (दि.08 मार्च) : दरवर्षी 8 मार्च हा दिवस  महिलांच्या शैक्षणिक सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल, तसेच स्त्री-पुरुष समानतेचे महत्व पटवून देण्यासाठी 'जागतिक महिला दिन' म्हणुन साजरा केला जातो. त्याअनुषंगानेच आज जिल्हाधिकारी कार्यालय परभणी व महिला व बालविकास विभाग परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व बालविवाह मुक्त परभणी अभियान निमित्त आज राजगोपालचारी उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान महिलांची भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 


रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गीता गुट्टे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके, बाल विकास प्रकल्प अधिकारी रुपाली रंगारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण अरविंद आकात यांनी केले. रॅलीमध्ये जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील सुमारे एक हजाराहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. यात प्रामुख्याने शिक्षिका, गृहिणी, अंगणवाडी सेविका यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांनी सहभाग नोंदविला होता.


तसेच जागतिक महिला दिनानिमित्त येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यलयात जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आंचल गोयल तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, सहायक आयुक्त समाज कल्याण गीता गुट्टे यांची उपस्थिती होती. यावेळी श्रीमती तलरेजा (प्रसिद्ध हॉटेल संचालिका), विधीज्ञ माधुरी क्षीरसागर, श्रीमती बबिता (सामजिक कार्यकर्त्या), डॉ स्नेहल लाभशेट्टवार (दंत्य रोग तज्ज्ञ), अनिता सरोदे (सामजिक कार्यकर्त्या) यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी प्रत्येक महिलेने स्वावलंबी होण्याकरिता प्रयत्न करावेत. तसेच महिलांनी बालविवाह मुक्त परभणी अभियानात सहभागी होवून, जिल्ह्यात होणाऱ्या बालविवाह सारख्या प्रथेला प्रतिबंध करण्याचे यावेळी आवाहन केले. श्रीमती माधुरी क्षिरसागर यांनी आई व मुलाचे पत्र वाचन करून भावूक अनुभूती दिली. श्रीमती बबिता यांनी महिलांना एड्स या आजाराची माहिती देवून मुलां-मुलीच्या लग्नापूर्वी एड्सची तपासणी करण्याचे आवाहन केले. श्रीमती स्नेहल लाभशेटवार यांनी महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. श्रीमती अनिता सरोदे यांनी स्वनुभवातून मुलीच्या जन्माचे स्वागत करणेबाबत आवाहान केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, परभणी  येथील अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या