🌟परभणी जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कर्मचारी मागील चार दिवसापासून संपावर....!


🌟जिल्ह्यात मार्च एन्डच्या तोंडावर शेकडो कोटींची कामे ठप्प : विकास कामे रखडली🌟

परभणी (दि.17 मार्च) : जूनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकरीता शासकीय - निमशासकीय कार्यालयातील सर्वच संवर्गातील हजारो कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून बेमुदत संपावर गेल्याने मार्च एन्डच्या तोंडावर शेकडो कोटींची कामे पूर्णतः ठप्प झाली आहेत. तर या बेमुदत संपाने शेकडो कोटींची कामे अखर्चित राहणार असे दुर्देवी चित्र उद्भवले आहे.

          14 मार्च पासून कर्मचार्‍यांचा संप सुरु आहे. या संपात जिल्ह्यातील महसूल यंत्रणेसह जिल्हा परिषद या दोन प्रमुख प्रचंड मोठे जाळे असणार्‍या सरकारी यंत्रणांचे हजारो कर्मचारी सहभागी आहेत. या व्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषि विभाग, जलसंधारण विभाग, आरोग्य विभाग तसेच अन्य महत्वपूर्ण शासकीय व निमशासकीय खात्यातील कर्मचारीही या संपात शंभर टक्के सहभागी झाले आहेत. या संपात नगरपालिकेसह महानगरपालिकेंतर्गत कर्मचारीही सहभागी आहेत.

          या संपाचा आता चौथ्या दिवसापासून हळूहळू का होईना परिणाम दिसतो आहे. विशेषतः शहरी भागात गल्ली बोळातील स्वच्छतेसह शहरांतर्गत विविध प्रभागातील विकास कामे ठप्प झाली आहेत. तर ग्रामीण भागात गावपातळीपासून तालुका पातळीपर्यंतची कामे ठप्प आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेसारख्या यंत्रणेंतर्गत सर्व संवर्गातील आठ हजारांवर कर्मचारी संपात सहभागी आहेत. त्यात अभियंता संघटना, कर्मचारी युनियन, ग्रामसेवक संघटना, विस्तार अधिकारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, पशू चिकित्सा व्यवसायिक कर्मचारी संघटना, कृषि तांत्रिक अधिकारी संघटना, अपंग कर्मचारी संघटना, लेखा कर्मचारी संघटना, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटना, औषध निर्माता कर्मचारी संघटना, विस्तार अधिकारी सांख्यिकी संघटना, बालविकास प्रकल्प पर्यवेक्षक संघटना, लघूलेखक संघटना, वाहनचालक संघटना, चतूर्थश्रेणी कर्मचारी संघटना, राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटना, शालेय कर्मचारी पेन्शन बचाव कृती संघटना, क्रिडा शिक्षक संघटना, मराठवाडा शिक्षक संघ इत्यादी संघटनेतील कर्मचारी ठिय्या मांडून आहेत.  त्याचा परिणाम जवळपास सर्वच कामे ठप्प आहेत. शेकडो कोटींची विकासकामे रखडली आहेत. हा संप सुरुच राहील्यास शेकडो कोटींची कामे अखर्चित राहणार,असे दुर्देवी चित्र आहे दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारीही सहभागी झाल्यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहारही ठप्प झाले आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या