🌟मंगरूळपीर तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथे लाखांवर भाविकांनी घेतला महाप्रसाद....!


◆ संत भायजी महाराज चरणी भाविक नतमस्तक ◆

◆ श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा ◆


फुलचंद भगत -

मंगरुळपीर (दि.३० मार्च) : पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या संत भायजी महाराज तिर्थक्षेत्र पिंपळखुटा संगम येथे गुरुवार ३० मार्च रोजी लाखांवर भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तत्पूर्वी श्रीराम नवमी निमीत्त संत भायजी महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. 


मंगरूळपीर तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथील संत भायजी महाराज यांनी १३२ वर्षापुर्वी अडाण व मडाण या पवित्र नद्याच्या संगमावर श्रीराम नवमी महोत्सवाचे आयोजन केले होते.  यावर्षी गुरुवार २३ मार्च ते गुरुवार ३० मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत ‘राम कृष्ण विठ्ठल हरि नारायण’ नामाचा अखंड जयघोष करण्यात आला आहे. तसेच राम नवमी निमीत्त गुरुवार ३० मार्च सकाळी ६ वाजता काकड आरती व त्यांनतर मंदीर प्रदक्षिणा म्हणजेच शोभायात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाली.  त्यानंतर संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ चांभई  यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. तसेच राम तर्‍हाळकर अकोला,नरेंद्रभाऊ हेटे मुुंबई व प्रकाश महाराज गावंडे यांच्या हस्ते श्रीराम,सिता, लक्ष्मण मृती व संत भायजी महाराज, शालवाले महाराज,बैरागी महाराज व नामदेव महाराज  यांच्या समाधीचे पुजन करण्यात आले. दुपारी १२ वाजता हभप पद्माकर तर्‍हाळकर यांच्या वाणीतून श्रीराम कथा प्रवचन व श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे. दुपारी 3 वाजता दहिहांडी उत्सव व  मंदीर प्रदक्षिणा करण्यात आल्या नंतर दुपारी ४ वाजतापासून  भाविक भक्तांना पंगतीत बसून महाप्रसादाचे वितरण करण्यात आलेआहे. या वेळी संत दर्शनासाठी हभप प्रकाश महाराज गावंडे, वैराग्यमुर्ती आकाशपुरी महाराज व हभप संजयनाथ महाराज उपस्थित होते. महाप्रसाद तयार करणे व वितरणाकरिता परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. तसेच विविध घटकांकडून पाणी पुरवठासह इतर सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच यात्रा उत्सवात डॉ. तुकारामजी धोटे मेमोरियल फाउंडेशन व हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.

* रोडगे व भाजीसाठी उसळला जनसागर :-

पिंपळखुटा संगम येतील संत भायजी महाराज यात्रेत गहू व ज्वारीपासून बनविलेले रोडगे आणि सर्व प्रकारच्या भाजीपाल्यापासून बनविलेली भाजी ही पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे हा महाप्रसाद घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला होता. विशेष म्हणजे परंपरेनुसार सर्वप्रथम महिलांना व नंतर पुरुषांना महाप्रसाद वितरित करण्यात आला.

🌟उद्यापासून ग्रंथ पारायण :-

शनिवार १ एप्रिल ते बुधवार ५ एप्रिल पर्यंत हभप प्रकाश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत भायजी महाराज ग्रंथ पारायण होणार आहे. तसेच गुरुवार ६ एप्रिल  रोजी हनुमान जयंती निमीत्त सकाळी ६ वाजता मंदीर प्रदक्षिणा व सकाळी ११ वाजता महाप्रसाद व नंतर नगर प्रदक्षिणाचे आयोजन करण्यात आले आहे.....

प्रतिनिधी :- फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या