🌟परभणी जिल्ह्यातील ‘महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज तात्काळ भरावेत.....!


🌟आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी सर्व महाविद्यालयांच्या प्रार्चायांना दिले🌟

परभणी (दि.०२ मार्च) : समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी चालू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी महाडीबीटी पोर्टलवरून नवीन अर्ज तात्काळ भरण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी सर्व महाविद्यालयांच्या प्रार्चायांना दिले आहे. 

नवीन व नूतनीकरणाच्या अर्जांची ऑनलाईन स्वीकृती, अर्जांची पडताळणी व मंजुरी करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. मात्र अद्यापही अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरले नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे अशा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, यासाठी तात्काळ अर्ज भरण्याचे आदेश‍ प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी दिले आहेत.

शैक्षणिक वर्षात गरजू व पात्र विद्यार्थ्यांना विविध निर्वाह भत्ता, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कबाबत ठराविक रक्कम अदा करण्यात येते. याबाबत महाविद्यालयांना वारंवार आवाहन करण्यात आले. मात्र अद्यापही अनेक महाविद्यालयांनी हे अर्ज भरले नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती अर्ज न भरल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता महाविद्यालयाच्या प्रार्चायांनी घ्यावी, असेही त्यांनी पत्राद्वारे कळविले आहे. 

तसेच सर्व पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अर्जांची १०० टक्के नोंदणी करून पुढील मंजुरीसाठी समाज कल्याण विभागाकडे पाठवावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या