💥प्रतिबंधित ज्वलनशील स्फोटक बारी पदार्थ बाळगून वापर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल...!


💥या प्रकरणात पोलिस पथकाने केला ८ लाखांचा मुद्देमाल जप्त💥

(फुलचंद भगत)

वाशिम:-ज्वलनशील स्फोटक पदार्थांच्या वापरामुळे अनेकदा जीवित व वित्तहानी उद्भवते. त्यामुळे शासनाने ज्वलनशील स्फोटक पदार्थ साठवणूक, विक्री व वापर करण्यावर प्रतिबंध घातला आहे. तरीही काही लोक छुप्या मार्गाने सदर स्फोटकांची साठवणूक, विक्री व वापर करतात. मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी प्रतिबंधित ज्वलनशील स्फोटक पदार्थ साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात आदेशित केले आहे.

     या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग करत असतांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पो.स्टे.रिसोडच्या पथकाने छापा टाकत ग्राम कवठा शेत शिवारातून प्रतिबंधित ज्वलनशील स्फोटक पदार्थ साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. ग्राम कवठा, ता.रिसोड शेतशिवारातील एका शेतात एक ब्लास्टिंगचा ट्रॅक्टर विनापरवाना अवैधरीत्या ब्लास्टिंगकरिता वापरण्यात येणारे स्फोटक पदार्थ वापरत कोणत्याही प्रकारची काळजी न घेता मनुष्याच्या जीवित्वास व मालमत्तेस हानी पोहोचेल अशा स्थितीत मिळून आला. पंचांसमक्ष ट्रॅक्टरची बारकाईने पाहणी केली व सुपर पावर ९० कंपनीचे ३० तोटे, जिलेटीन इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर १० नग, १०० फुट वायर, ०१ फार्म ट्रॅक कंपनीचा ट्रॅक्टर, ०१ महिंद्रा ४७५ डीआय कंपनीचा ट्रॅक्टर, एक कॉम्प्रेसर मशीन व एक लोखंडी ड्रील मशीन असा एकूण ८,१०,६१०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर प्रकरणी पो.स्टे.रिसोड येथे अप.क्र.७३/२३, कलम ५ ज्वलनशील पदार्थ अधिनियम १९५२ सहकलम ५, ९ (ब) १ (ब) बारी पदार्थ अधिनियम १९८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.देवेंद्रसिंह ठाकूर, प्रभारी पोलीस स्टेशन अधिकारी, रिसोड, पोउपनि.विजय अजमिरे, पोहवा.विशाल एकाडे, चापोना.साहेबराव मुकाडे नेमणूक पो.स्टे.रिसोड यांनी पार पाडली.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या